(रत्नागिरी / वार्ताहर)
कोकणातील मान्सून हा निसर्गसौंदर्याचा अद्भुत अनुभव असला, तरी मुसळधार पाऊस आणि डोंगराळ भौगोलिक परिस्थितीमुळे रेल्वे वाहतुकीसमोर मोठी आव्हाने उभी राहतात. प्रवाशांची सुरक्षितता आणि अखंड रेल्वे सेवा या सर्वोच्च प्राधान्यांना केंद्रस्थानी ठेवत कोकण रेल्वेने संपूर्ण मार्गावर व्यापक मान्सूनपूर्व तयारी पूर्ण केली आहे.
सक्रिय आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजनाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, भू-सुरक्षा उपाययोजना, अत्याधुनिक निरीक्षण प्रणाली, वाढीव गस्त आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आल्या आहेत. भू-सुरक्षा आणि निरीक्षण तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण प्रगतीमुळे कोकण रेल्वे यंदाच्या मान्सून हंगामातील आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे.
15 जून ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष मान्सून वेळापत्रक लागू राहणार असून सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वे वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी विविध संवेदनशील विभागांमध्ये वेगमर्यादा लागू करण्यात येणार आहेत.
पायाभूत सुविधा आणि भू-सुरक्षा उपाययोजना
● उतारांची स्थिरता वाढविण्यासाठी निवडक ठिकाणी कटिंग स्लोप्स सपाट करणे तसेच सॉइल नेलिंगची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
● बोगदे आणि कटिंग भागांमध्ये रॉक बोल्टिंग व शॉटक्रीटिंगद्वारे भूगर्भीय संरचना अधिक मजबूत करण्यात आल्या आहेत.
● गॅबियन भिंती, रिटेनिंग वॉल्स, मायक्रोपाइल्स आणि बोल्डर नेटिंगसारख्या संरचनांद्वारे दरडी कोसळणे व माती घसरण्याच्या धोक्यांवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.
● साइड ड्रेन्स आणि कॅचवॉटर ड्रेन्सची साफसफाई व काँक्रीट लाइनिंगची कामे पूर्ण करून पावसाळ्यातील जलनिस्सारण सुरळीत राहील याची खबरदारी घेण्यात आली आहे.
● संवेदनशील ठिकाणी पोर्टेबल डीवॉटरिंग पंप तैनात करण्यात आले आहेत.
● या सातत्यपूर्ण उपाययोजनांमुळे मागील दशकात मान्सून काळात दगड कोसळल्याने रेल्वे सेवेत कोणताही मोठा व्यत्यय आलेला नाही.
मान्सून गस्त आणि आपत्कालीन यंत्रणा
● संवेदनशील ठिकाणी 657 प्रशिक्षित कर्मचारी चोवीस तास गस्तीसाठी तैनात करण्यात येणार आहेत.
● चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि वेरणा येथे BRN वॅगनवर बसविलेले एक्स्कॅव्हेटर सज्ज ठेवण्यात आले आहेत.
● रेल्वे मेंटेनन्स वाहने (RMV) वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेरणा, कारवार, भटकल आणि उडुपी येथे तैनात करण्यात आली आहेत.
● माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमळी, कारवार आणि उडुपी येथे टॉवर वॅगन्स सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
सुरक्षिततेसाठी विशेष उपाय
● कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत लोको पायलटांना रेल्वेचा वेग ताशी 40 किमी मर्यादित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
● रेल्वे रुळांच्या पातळीपेक्षा 100 मिमीपेक्षा अधिक पाणी साचल्यास गाडी थांबविण्यात येणार असून पाणी ओसरल्यानंतरच सेवा पुन्हा सुरू केली जाईल.
● माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमळी, कारवार आणि उडुपीसह विविध स्थानकांवर अपघात निवारण वैद्यकीय उपकरणे (ARME Scale-II) उपलब्ध ठेवण्यात आली आहेत.
● रत्नागिरी आणि वेरणा येथे ऑपरेशन थिएटर व आपत्कालीन वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज ARMV वाहने तैनात आहेत.
● वेरणा येथे Accident Relief Train (ART) 15 मिनिटांत रवाना होण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.
● आपत्कालीन परिस्थितीसाठी JCB, पोकलेन आणि डंपरची व्यवस्था स्थानिक संस्थांमार्फत करण्यात आली आहे.
सुधारित संपर्क आणि तंत्रज्ञानाधारित निरीक्षण
● सुरक्षा कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन, तर लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर्सना वॉकी-टॉकी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
● प्रत्येक 1 किमी अंतरावर तसेच 2 किमीपेक्षा अधिक लांबीच्या बोगद्यांमध्ये प्रत्येक 400 मीटरवर आपत्कालीन संपर्क सॉकेट्स (EMC) बसविण्यात आले आहेत.
● ART आणि ARMV मध्ये सॅटेलाइट फोनची सुविधा उपलब्ध आहे.
● माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, मडगाव, कारवार, भटकल आणि उडुपी येथे स्वयं-नोंदणी करणारे पर्जन्यमापक कार्यरत आहेत.
● महत्त्वाच्या पुलांवर पूर सूचना प्रणाली आणि अॅनेमोमीटर बसविण्यात आले असून धोकादायक परिस्थितीची तत्काळ माहिती अधिकाऱ्यांना मिळणार आहे.
24×7 नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय मदत
● मान्सून काळात बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहतील.
● सर्व 72 स्थानकांवरील CCTV प्रणालींचे निरीक्षण स्टेशन मास्टर कार्यालये आणि RPF चौक्यांमधून केले जाणार आहे.
● भारतीय हवामान विभागाशी समन्वय साधून दररोज हवामानाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना SMS अलर्ट पाठवले जातील.
● चिपळूण, रत्नागिरी, वेरणा, मडगाव, कारवार आणि उडुपी येथे वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
प्रवाशांसाठी माहिती
प्रवाशांना www.konkanrailway.com या संकेतस्थळावर किंवा 139 हेल्पलाईन क्रमांकावर रेल्वेची अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे सुरक्षितता, विश्वासार्ह सेवा आणि प्रवासी सुविधांसाठी कटिबद्ध असून व्यापक तयारी आणि सतत देखरेखीच्या माध्यमातून संपूर्ण मान्सून हंगामात सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे सेवा देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल बं. नारकर यांनी कळवले आहे.

