(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सिमेंट पोत्यांची वाहतूक करणारा कंटेनर बुधवारी मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा घाटातील तीव्र वळणावर उलटून अपघात झाला. कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला असून, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. परिणामी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अपघातग्रस्त कंटेनर (केए २८ एए ६०७२) सिमेंटची पोती घेऊन कर्नाटकहून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. बुधवारी दुपारच्या सुमारास हातखंबा घाटातील वळणावर येताच सिमेंट पोत्यांनी भरलेल्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटला. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने उलटलेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला हटविण्यात आला. त्यानंतर काही वेळातच विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू होती.

