(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरालगतच्या खेडशी परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसची धडक लागून गायीच्या वासराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी एसटी चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
मुरलीधर पुंडलिकराव चांभारे (रा. चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. खेडशी येथील श्रीराम फायनान्स गोदामासमोर गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. याबाबत गणेश विजय गायकवाड (वय ४२, रा. लक्ष्मीनारायण नगर, खेडशी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, चिपळूण-रत्नागिरी मार्गावर धावणारी एसटी बस (एमएच-२०-बीएल-३५७७) घेऊन चालक चांभारे रत्नागिरीच्या दिशेने येत होते. खेडशी येथे आल्यानंतर त्यांनी बस भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या गायीच्या वासराला धडक बसली.
धडक इतकी तीव्र होती की, वासराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ हळहळ व्यक्त करण्यात आली. तक्रारीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस फौजदार टेमकर करीत आहेत.
मिऱ्या-नागपूर महामार्गावर गेल्या काही महिन्यांत वाहनांच्या धडकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. वेगवान वाहतूक, वाढती वाहनसंख्या आणि रस्त्यावर अचानक येणारी जनावरे यामुळे अपघातांचा धोका अधिक गंभीर बनला आहे. विशेषतः उनाड गुरांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत असून, रस्ता ओलांडताना अनेक जनावरांना आपला जीव गमवावा लागत आहे. गुरे मोकाट सोडणाऱ्या मालकांवर कारवाईची गरज
सार्वजनिक रस्त्यांवर गुरे मोकाट सोडण्याच्या प्रकारांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
जनावरांच्या सुरक्षिततेबरोबरच वाहनचालकांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याने मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. केवळ जनजागृती नव्हे, तर प्रभावी अंमलबजावणीचीही आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दुभाजकामुळे जनावरांची कोंडी
हातखंबा ते रत्नागिरी या वर्दळीच्या मार्गावर बसविण्यात आलेल्या लोखंडी दुभाजकांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली असली, तरी जनावरांच्या हालचालींसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. रस्त्याच्या एका बाजूला गेलेली गुरे दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी सुरक्षित मार्ग नसल्याने ती दुभाजकांजवळच अडकून पडतात किंवा अचानक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. परिणामी अपघातांचा धोका अधिक वाढतो.
महामार्गाच्या उभारणीवेळी वाहतुकीच्या गरजांबरोबरच स्थानिक परिस्थिती आणि पशुधनाच्या हालचालींचाही विचार होणे आवश्यक होते. काही अंतरावर दुभाजकामधील मोकळी जागा सोडल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकेल. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या मुद्द्याचा गांभीर्याने विचार करून आवश्यक सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

