(चिपळूण / वार्ताहर)
जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी सरचिटणीस अमित केतकर यांचा सत्कार करण्यात आला. संघ विचाराचे ज्येष्ठ व एकनिष्ठ कार्यकर्ते एकनाथ सहस्रबुद्धे यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी अमित केतकर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाचा उपयोग वैयक्तिक नव्हे, तर जनहितासाठी आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्याची ग्वाही दिली. जिल्ह्यातील लोकहिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच नियोजन समितीच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. “आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या सत्कार समारंभास विनोद सुर्वे, विवेक गोखले, अविनाश सावर्डेकर, राम शिंदे, मंदार टोपरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

