(मुंबई / सुरेश सप्रे)
८वी अखिल भारतीय जलद रोल स्केटिंग मानांकन स्पर्धा २०२५ १५ते १९ मे दरम्यान कोचीन केरळ येथे संपन्न होत असून या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात रेयांश बने याची निवड झाली आहे रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने व मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा एर्नाकुलंम कोंची केरळ येथे घेण्यात येणार आहे. यात ६ते८, ८ते१०, १०ते१२, १२ते१५, १५ ते१८ अशा पाच वयोगटातील मुले – मुली व पुरुष व महिला खुला गट असे विविध गट सहभागी होणार असून यातून अखिल भारतीय मानांकन ठरणार आहे.
या अखिल भारतीय जलद स्केटिंग मानांकन स्पर्धेत रेयांश पृथा पराग बने याची निवड झाली आहे. रेयांश हा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणारा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये 28 सुवर्ण 10 रौप्य आणि 8 कांस्य पदके पटकावली आहेत.
महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार डॉ. सुभाष बने यांचा नातू रेयांश बने हा युरो स्कूल, ऐरोली, ठाणे या शाळेचा विद्यार्थी असून वयाच्या पाचव्या वर्षी त्याने महाराष्ट्रातील बेळगाव येथे सतत 96 तास स्केटिंग करून आपले नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे.
रेयांश पृथा पराग बने हा शिवसेना भांडूपचे युवानेते पराग बने यांचा चिरंजीव आहे. त्याच्या यशाबद्दल सर्व थरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून मानांकन स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.