(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात पोलिस आणि प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून ड्रग्ज तस्करीशी संबंधित दोन सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी जीवन देसाई यांनी संबंधित दोघांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
मोहम्मद ताहिर इब्राहिम मस्तान (रा. वरचा मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी) आणि झहीर मेहमुद काझी (रा. गवळीवाडा, रत्नागिरी) अशी तडीपार करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) अंतर्गत त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यांच्या हालचालींमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने नोंदविला आहे. या दोघांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांची नोंद घेत उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. प्रस्तावातील पुरावे, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि स्थानिक नागरिकांवर होणारा परिणाम यांचा विचार करून उपविभागीय दंडाधिकारी जीवन देसाई यांनी चार जिल्ह्यांमधून हद्दपारीचे आदेश जारी केले.
जिल्ह्यातील तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी आणि ड्रग्ज तस्करीच्या साखळीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेतील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. विशेषतः मिरकरवाडा आणि गवळीवाडा परिसरातील गुन्हेगारी हालचालींवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने या निर्णयाकडे पाहिले जात आहे. दरम्यान, अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत आगामी काळातही कठोर कारवाईचा धडाका कायम राहणार असल्याचे संकेत पोलिस यंत्रणेकडून देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे ड्रग्ज तस्करीशी संबंधित घटकांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

