(राजापूर/ तुषार पाचलकरा)
राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्प धरण आज मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजता १०० टक्के भरले असून, धरणाच्या सांडव्यावरून २.४१ क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धरण परिसर आणि अनुषंगिक भागात नागरिकांच्या प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नागरिकांनी धरण परिसर, नदीपात्र, नाले तसेच इतर धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अर्जुना धरणाची सद्यस्थिती
प्रकल्प : अर्जुना मध्यम प्रकल्प, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
पाणीपातळी : १७७.०५ मीटर
उपयुक्त पाणीसाठा : ७२.५६ दशलक्ष घनमीटर
धरण भराव क्षमता : १०० टक्के
गेल्या २४ तासांतील पाऊस : ७४ मिमी
१ जून २०२६ पासून एकूण पर्जन्यमान : २००१ मिमी
सांडवा विसर्ग : २.४१ क्युमेक्स
विमोचक विसर्ग : ०.०० क्युमेक्स
सदर माहिती उपअभियंता अमोल एकनाथ बनसोडे (पाटबंधारे प्रकल्प बांधकाम उपविभाग, लांजा) यांनी दिली आहे. प्रशासनाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

