( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
जिल्ह्यातील भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था आपल्या सामाजिक बांधिलकीतून ‘एक घास आजी-आजोबांसाठी’ हा हृदयस्पर्शी उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाचा उद्देश दिवाळीच्या सणात समाजातील निराधार व ज्येष्ठ नागरिकांना आनंदाची ऊब देणे हा आहे. दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा सण आणि हा आनंद प्रत्येक घराघरात पोहोचविण्यासाठी भाकर संस्थेने पुढाकार घेतला आहे.
संस्थेच्या या मोहिमेतून वस्तू तसेच आर्थिक स्वरूपात मदत करून समाजातील प्रत्येक व्यक्ती आपल्या आजी-आजोबांच्या सुखद दिवाळीस हातभार लावू शकते. फराळाचे पदार्थ, कपडे, साबण-उटणे, पणत्या, पूजासाहित्य तसेच इतर आवश्यक वस्तू या स्वरूपात मदत स्वीकारली जात आहे. संस्थेचे स्वयंसेवक ही सर्व मदत थेट देणगीदारांकडून गोळा करून ती गरजू आजी-आजोबांपर्यंत पोहोचवणार आहेत.
दिवाळीचा खरा अर्थ फक्त दिवे लावणे नाही, तर आनंदाची किरणे इतरांच्या जीवनात पसरवणे आहे. आपल्या छोट्याशा मदतीने आपण अनेक ज्येष्ठांच्या मनात आनंदाची ज्योत प्रज्वलित करू शकतो. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी किंवा साहित्य देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. श्रीमती अश्विनी मोरे (९९७०३८११९५), श्री. पवनकुमार मोरे (८६६९८५८३२४) आणि श्री. देवेंद्र पाटील (७५०७७९५३२१). ‘एक घास आजी-आजोबांसाठी’ हा उपक्रम केवळ देणगीचा नव्हे, तर माणुसकीच्या नात्याला उजाळा देणारा आहे.

