(सोलापूर)
शेअर मार्केटमधील मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे नैराश्यात गेलेल्या एका मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन लहान मुलांना विष देऊन स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये मुख्याध्यापक योगेश पाटील, पत्नी माधुरी पाटील तसेच दोन मुलगे अथर्व आणि शिवांश यांचा समावेश आहे. बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात हे कुटुंब वास्तव्यास होते.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. नोकरी सांभाळताना त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू झालेली गुंतवणूक नंतर मोठ्या व्यवहारांपर्यंत पोहोचली. मात्र, सातत्याने नुकसान होत गेल्याने त्यांच्यावर तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांचे कर्ज झाले होते.
कर्जाचा वाढता बोजा आणि आर्थिक तणाव यामुळे योगेश पाटील मानसिक तणावाखाली आले होते. कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
योगेश बाळासाहेब पाटील (वय ४१, व्यवसाय- शिक्षक), माधुरी योगेश पाटील (वय ३७, पत्नी), अथर्व योगेश पाटील (वय ११, मुलगा) आणि शिवांश योगेश पाटील (वय ९, मुलगा) अशी मृत पावलेल्या दुर्दैवी कुटुंबीयांची नावे आहेत
घटनेच्या दिवशी त्यांनी पत्नी आणि दोन निष्पाप मुलांना आईस्क्रीममधून विष दिले. विषप्राशनानंतर काही वेळातच तिघांचाही मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाल्याची खात्री करून योगेश पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे बार्शी तालुक्यात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. योगेश पाटील, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना २२ पानी सुसाईड नोटही आढळून आली असून तिच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
अलीकडच्या काळात झटपट पैसे कमावण्याच्या अपेक्षेने अनेक जण शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. सोशल मीडियावरील दिखाऊ यश पाहून अनेक गुंतवणूकदार आकर्षित होत असले तरी योग्य आर्थिक नियोजन आणि तज्ज्ञ सल्ल्याविना केलेली गुंतवणूक धोकादायक ठरू शकते, याचीही चर्चा या घटनेनंतर होत आहे.

