(रत्नागिरी / वार्ताहर)
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरी प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्यादितच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीमती गुलजार रमजान डोंगरकर यांचा भव्य सत्कार व शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, उर्दू माध्यमातील पदोन्नत केंद्रप्रमुख, सेवानिवृत्त शिक्षक तसेच विविध मान्यवरांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख ₹५,०००, शाल, सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
कु. झोया तबरेज मिरकर (जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, पडवे उर्दू, ता. गुहागर) हिने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण तालुका गुणवत्ता यादीत प्रथम, तर ग्रामीण जिल्हा गुणवत्ता यादीत नववा क्रमांक मिळविला.
कु. हूमेरा साकिब सोलकर (जि.प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा, कर्ला उर्दू मुलींची, ता. रत्नागिरी) हिने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत १३२ वा क्रमांक मिळविला.
कु. माहिरा सजाकत रोगनगर (जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, पाचल उर्दू, ता. राजापूर) हिने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत १५८ वा क्रमांक पटकावला.
पदोन्नत केंद्रप्रमुखांचाही गौरव
उर्दू माध्यमातील केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांचा शाल, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये मुनाफ गुहागरकर (कुरधुंड उर्दू, संगमेश्वर), आसिफ शेख (कडवई उर्दू, संगमेश्वर), नाझिया पटेल (फुरूस उर्दू, खेड), शबनम पीरखान (सौंदळ उर्दू, राजापूर) आणि मॅक्सिमा पावस्कर (कातली उर्दू, राजापूर) यांचा समावेश होता. याशिवाय सेवानिवृत्त शिक्षक अखलाक सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच रत्नागिरी प्राथमिक शिक्षक पतपेढीचे तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती झालेल्या सतीश सावर्डेकर आणि सचिन चांदिवडे यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष अखलाक परकर होते. प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर, शिक्षक नेते बळीराम मोरे, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सचिव संतोष पावणे तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष हिदायत कासिम नाईक, जिल्हा सचिव मुनाफ नूरमोहम्मद गुहागरकर तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजिम कोतवडेकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही अशाच उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

