(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दख्खन स्पॉट ते आंबा घाट परिसरात जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत मारहाण, दमदाटी आणि २५ हजार रुपयांची लूट केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना मोठा धक्का बसला आहे. अतिरिक्त सत्र न्यायालय, रत्नागिरी यांनी या प्रकरणातील विविध आरोपींनी दाखल केलेले जामीन अर्ज फेटाळत गुन्ह्याचे गांभीर्य, आरोपींचा प्रथमदर्शनी सहभाग आणि सुरू असलेला तपास यावर स्पष्ट शिक्कामोर्तब केले आहे.
देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०९(४), ३१०(१), २०४, ११२, १४०(२), १२७(२), ११५(२), ३५१(४) तसेच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, ८ एप्रिल २०२६ रोजी जनावरांची वाहतूक करणाऱ्या चालकाचे वाहन आंबा घाट मार्गावर अडविण्यात आले. त्याला वाहनातून खाली उतरवून मारहाण करण्यात आली. चाकूचा धाक दाखवत ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली असून वाहनातील २५ हजार रुपये जबरदस्तीने घेण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच चालकाला धमकावत काही अंतरापर्यंत नेण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना निष्पन्न केले असून त्यापैकी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपींमध्ये फरहान रशीद मुल्ला (वय ४२, रा. कोकणनगर, रत्नागिरी), प्रथमेश सचिन भाटकर (वय २४, रा. गोळप), सर्वेश सुभाष कीर (वय २२, रा. सोमेश्वर कीरबाग), शार्दुल सुनील कीर (वय २४, रा. सोमेश्वर कीरबाग), संतोष बाळू गोसावी (वय ३८, रा. टीआरपी सावंतनगर झोपडपट्टी), कथित मुख्य सूत्रधार शादाब गणी बलबले (वय ३२, रा. कोकणनगर-क्रांतीनगर), भूषण बिपिंद्र सावंत (वय २६, रा. मिऱ्या), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (वय २६, रा. कुवारबाव) आणि अरबाज मजीद बांगी (वय ३१, रा. मजगाव) यांचा समावेश आहे. या आरोपींपैकी फरहान मुल्ला, प्रथमेश भाटकर, सर्वेश कीर, शार्दुल कीर, संतोष गोसावी, शादाब बलबले, भूषण सावंत आणि धर्मलिंगम नाडर यांनी सत्र न्यायालयात स्वतंत्र जामीन अर्ज दाखल केले होते. मात्र उपलब्ध तपास कागदपत्रांचा आढावा घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींविरोधात प्रथमदर्शनी पुरेसा पुरावा असल्याचे नमूद केले.
गुन्ह्यात शस्त्राचा वापर झाल्याचा आरोप, वाहनचालकाला अडवून धमकावल्याची बाब, कथित लूट आणि सुरू असलेला तपास या सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. काही आरोपी अद्याप फरार असून तपास अपूर्ण असल्याचेही नोंदवत, अशा गंभीर गुन्ह्यात या टप्प्यावर आरोपींना जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत.
दरम्यान, अरबाज मजीद बांगी याच्याबाबत तपासादरम्यान तो गुन्ह्यात सहभागी नसल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा बचाव पक्षाने एका जामीन सुनावणीत न्यायालयासमोर केला होता. तपास कागदपत्रांमध्ये त्याचे नाव चुकीने नमूद झाल्याचेही सांगण्यात आले होते. त्यामुळे या आरोपीबाबतची अंतिम स्थिती पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. तसेच तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील किमान एक आरोपी अद्याप फरार असून तपास सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

