(रत्नागिरी)
जिल्ह्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीला शंभर टक्के यश मिळेल, असा ठाम विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. दावोस दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यावेळी त्यांनी चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत ‘मैत्रिपूर्ण लढत’ होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
रत्नागिरी तालुक्यातील पावस गटातून जिजाऊ संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच खेडशी गटातून हर्षदा भिकाजी गावडे, शिरगाव गटातून श्रध्दा दीपक मोरे, गोळप गटातून नंदकुमार उर्फ नंदा मुरकर, तर खालगाव गटातून शिवसेना तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. रत्नागिरी तालुक्यातील दहा पैकी पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा या पहिल्या यादीत करण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुक्यात कसबा गटातून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रचना राजेंद्र महाडीक, मुचरी गटातून माधवी गिते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुहागर तालुक्यात वेळणेश्वर गटातून नेत्रा ठाकूर, तर पडवे गटातून माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांची नावे पहिल्या यादीत समाविष्ट आहेत. रत्नागिरी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी हातखंबा गणातून विद्या बोंबले, देऊड गणातून नेहा गावणकर, केळ्ये गणातून सुमेश आंबेकर, नाणीज गणातून डॉ. पद्मजा कांबळे, तर साखरतर गणातून परेश सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उमेदवारी जाहीर करताना पालकमंत्री सामंत म्हणाले की, खेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा लवकरच राज्यमंत्री योगेश कदम करतील. भाजपाचा सन्मान राखून संबंधित ठिकाणी जागा सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना-भाजप युतीबाबत स्थानिक पदाधिकारी, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपाला दिलेला शब्द पाळला जाईल, असा पुनरुच्चार करताना सामंत यांनी चिपळूणमध्ये राष्ट्रवादीसोबत मैत्रिपूर्ण लढतीची शक्यता व्यक्त केली. संगमेश्वर तालुक्यात मात्र महायुती एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली. लांजा-राजापूर तालुक्यांतील उमेदवारांची घोषणा लवकरच करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

