(गणपतीपुळे / वैभव पवार)
विश्वशांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्धांनी अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी पंचशील दिले आहे. त्यामुळे या पंचशीलाचे पालन केल्यास प्रत्येक मनुष्याचे कल्याण होईल, असे प्रतिपादन रत्नागिरी संस्कार समितीचे बौद्धाचार्य रविकांत पवार यांनी केले. रत्नागिरी तालुक्यातील जयगड साखरी बौद्धवाडी येथील सामग्गी बुद्ध विहारात आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास धार्मिक प्रबोधन कार्यक्रमात ते प्रमुख प्रवचनकार बोलत होते.
यावेळी त्यांनी पंचशीलाचे महत्त्व सांगताना मनुष्याने आपल्या जीवनातील नाशवंत गोष्टींना बाजूला ठेवून कशाप्रकारे चांगल्या गोष्टी अंगी कारायला हव्यात, याबाबत विविध उदाहरणे देऊन व गोष्टी रूपात अतिशय मौलिक प्रकारचे जनजागृतीपर धार्मिक प्रबोधन केले.बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी व संस्कार समिती रत्नागिरी आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठ जयगड साखरी बौद्धवाडी यांचे संयुक्त विद्यमाने या वर्षावास धार्मिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम नुकताच जयगड गाव शाखेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी रत्नागिरी तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, संस्कार समितीचे बौद्धाचार्य संदीप जाधव, दीपक गमरे,वैभव पवार ,प्रसिद्धी प्रमुख किशोर पवार, जयगडचे माजी सेवानिवृत्त तलाठी उत्तम जाधव जयगड शाखेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, जयगड महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रियंका जाधव, पोलिसपाटील सायली जाधव, रत्नागिरी तालुका संस्कार समितीच्या सदस्या करुणा पवार, संघमित्रा पवार ,प्रमोद पवार आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गाव शाखांमधील प्रमुख प्रतिनिधी, बौद्धाचार्य, श्रामनेर, जयगड गाव शाखेचे प्रमुख पदाधिकारी, महिला मंडळाचे पदाधिकारी व लहान थोर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सामग्गी बुद्ध विहारातील आदर्शांसमोर गंध व दीप प्रज्वलन करण्यात आले .त्यानंतर उपस्थित बौद्धाचार्यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आली. यानंतर या कार्यक्रमात प्रवचनकार रविकांत पवार यांनी अतिशय उद्बबोधक असे धार्मिक प्रवचन देऊन उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करून बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. त्यानंतर जयगड शाखेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी आपल्या मनोगतात प्रवचनकार रविकांत पवार यांनी अतिशय उत्तम प्रकारे धार्मिक प्रबोधन केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त केले. तसेच तालुका शाखेने आपल्या गावशाखेत हा अतिशय स्तुत्य कर्यक्रम घेऊन धार्मिक जनजागृती केल्याबद्दल तालुका शाखेच्या प्रमुख पदाधिकारी संस्कार समिती सदस्यांचे देखील विशेष ऋण व्यक्त करून तालुका शाखेच्या गतिमान वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे जयगड गाव शाखेच्या वतीने सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन चिटणीस नरेश सावंत यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयगड गाव शाखेच्या प्रमुख पदाधिकारी व सामग्गी महिला मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी व सर्व सदस्यांनी आणि तरुण मंडळाने विशेष मेहनत घेतली.

