(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील आरे येथे ट्रॅक्टर आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात तरुणीचा मृत्यू झाल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात तन्वी दादासाहेब पुकळे (वय २१, रा. विटा, जि. सांगली) या तरुणीचा मृत्यू झाला होता. २३ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील आरे येथे हा अपघात घडला होता. याप्रकरणी तेजस दादासाहेब पुकळे (वय २८, रा. विटा खानापूर, सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक ओंकार मानसिंग पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेजस पुकळे हे आई-वडील आणि बहिणीसह कार (क्रमांक एमएच १० डीक्यू ४४८१) मधून रत्नागिरीहून गणपतीपुळेकडे जात होते. त्याचवेळी ओंकार पाटील हा ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १० ईए ७९६४) घेऊन आतील बाजूने मुख्य रस्त्यावर येत होता. याच दरम्यान आरे येथे ट्रॅक्टरची कारच्या डाव्या बाजूला जोरदार धडक बसली.
या अपघातात कारमधील प्रवाशांना दुखापत झाली. मात्र, तन्वी पुकळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर तब्बल काही दिवसांनी, मंगळवारी (९ जून) रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

