(संगमेश्वर / एजाज पटेल)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या धामणी नं. २ शाळेतील प्राथमिक शिक्षिका सौ. रसिका रविकांत शिंदे यांना ‘भारतीय कष्टकारी रयत’ (भाकर) संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच अध्यापन क्षेत्रातील आपली निष्ठा जपत त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे.
सौ. रसिका शिंदे यांनी अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. ग्रामीण भागातील मुलांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम तसेच खेळ आणि बागेच्या माध्यमातून शिक्षण देण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य ठरले आहेत. संसारातील जबाबदाऱ्या आणि सासर-माहेरच्या कुटुंबीयांप्रती असलेली कर्तव्ये पार पाडत त्यांनी अध्यापनातील सातत्य कायम ठेवले.
‘भारतीय कष्टकारी रयत’ (भाकर) संस्थेच्या वतीने आयोजित समारंभात त्यांना सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजभूषण पुरस्कारप्राप्त दिलीप रेडकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. समीर जाधव उपस्थित होते. तसेच आमदार भैया सामंत यांचे स्वीय सहाय्यक रमजान गोलंदाज, भाकर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. पाटील साहेब आणि संस्थेच्या सचिव श्रीमती अश्विनी मोरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सौ. रसिका शिंदे यांनी या सन्मानाचे श्रेय आपल्या कुटुंबीयांना, पती रविकांत शिंदे, सहकारी शिक्षक आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवरांना दिले. त्या म्हणाल्या, “हा मिळालेला पुरस्कार केवळ माझा नसून, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले माझे कुटुंब, माझे प्रेरणास्थान असलेले पती श्री. रविकांत शिंदे, माझे सहकारी शिक्षक आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मान्यवरांचा आहे. संसाराची अवघड वाट तुडवत असताना माझ्या घरच्यांनी आणि मुलांनी दिलेली साथ नसती, तर इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नसता. ग्रामीण भागातील ही माझी लेकुरे म्हणजेच माझे विश्व असून, त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी अखेरपर्यंत अशीच झटत राहीन. ‘भाकर’ संस्थेने माझ्या या छोट्याशा कार्याची घेतलेली दखल आणि दिलेला हा राज्यस्तरीय पुरस्कार माझ्या पुढील प्रवासासाठी माझ्या आई-वडिलांच्या आणि गुरुरूपाशी आशीर्वादासारखाच आहे.”
सौ. रसिका शिंदे यांना यापूर्वी सन २०१९ मध्ये जिल्हा परिषद आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच चंद्रभागा प्रतिष्ठानच्या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आता ‘भाकर’ संस्थेच्या राज्यस्तरीय पुरस्काराची भर त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत पडली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण विभाग, विविध सामाजिक संस्था, धामणी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, आप्तेष्ट आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली कर्तव्यनिष्ठा यांचा समतोल साधत त्यांनी मिळवलेले हे यश संगमेश्वर तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.


