(रत्नागिरी / वार्ताहर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील तीन मल्लांनी सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. या तिन्ही खेळाडूंनी आपापल्या वजन गटांत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाची भर पडली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील आदर्श हायस्कूल, कुरतडे या शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात सुवर्णपदकांची कमाई केली. ५२ किलो वजन गटात सोहम खंडेराव पाटील याने, तर ५७ किलो वजन गटात समर्थ संजय कुदळे याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अव्वल स्थान मिळवले. या दोन्ही खेळाडूंना क्रीडा शिक्षक आणि मार्गदर्शक मानसिंग कदम सर यांचे मार्गदर्शन लाभले.
महात्मा गांधी विद्यालय, उंबरे येथील राजवीर सतीश पवार यानेही ३८ किलो वजन गटात दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्याला मार्गदर्शक मारुती गलांडे सर यांचे मार्गदर्शन मिळाले. सोहम पाटील, समर्थ कुदळे आणि राजवीर पवार या तिन्ही मल्लांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खेळाडूंच्या सरावासाठी आधुनिक कुस्ती मॅट उपलब्ध करून दिल्या आहेत. मॅटवर नियमित सराव केल्यामुळेच यंदाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंना मोठे यश मिळाले, अशी प्रतिक्रिया विजयी खेळाडू आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केली.
या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलणकर, कार्यवाह सदानंद जोशी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी तिन्ही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच रत्नागिरीचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी सुवर्णपदक विजेत्या मल्लांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या या तिन्ही खेळाडूंना त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


