(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जयगड येथील जिंदल कंपनीच्या वादग्रस्त गॅस टर्मिनलमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाबाबत जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र सागरी महामंडळ आणि कृषी विभागाकडून तात्काळ अहवाल मागविण्यात आला आहे. लवकरच संबंधित विभागांकडून स्थळपाहणी करून सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला जाणार आहे.
रत्नागिरीत अलीकडेच झालेल्या हक्कयात्रेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जिंदल कंपनीवर गंभीर आरोप करत, “कंपनीने बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे गॅस टर्मिनल उभारणीसाठी मंजुरी मिळविली असून, यामुळे परिसरात गंभीर प्रदूषण होत आहे,” असा आरोप केला होता. या आरोपांची दखल घेत जिल्हा प्रशासनाने उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रदूषणासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गॅस टर्मिनलबाबतच्या परवानग्या आणि तांत्रिक प्रमाणपत्रांचा तपशील महाराष्ट्र सागरी महामंडळाकडून मागविण्यात आला आहे.
कृषी उत्पादन आणि वारसा स्थळांवरही परिणामाचा तपास
जिंदल वीज कंपनीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे परिसरातील आंबा बागांवर थर बसत असून, आंबा उत्पादनावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्हा कृषी अधीक्षकांना स्थळपाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय जयगडच्या ऐतिहासिक किल्ल्याला पडलेल्या तड्यांबाबतही लक्ष वेधण्यात आले असून, त्या संदर्भात पुरातत्व विभागाला तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
नागरिकांच्या नजरा प्रशासनाकडे
जिंदल कंपनीविरोधातील या सर्व अहवालानंतर जिल्हा प्रशासन कोणती पावले उचलणार, याकडे आता जयगड परिसरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पर्यावरणीय संतुलन, स्थानिकांचे आरोग्य आणि शेतीचे नुकसान या त्रिसूत्री प्रश्नांवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

