(खेड / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा खेड यांच्या वतीने नवनियुक्त शिक्षकांचा स्वागत सोहळा शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचायत समिती, खेड येथे उत्साहात पार पडला. यावेळी नव्याने रुजू झालेल्या शिक्षक-शिक्षिकांचा शाल, पुष्पगुच्छ आणि अभिनंदनपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी शिक्षक संघाच्या कार्याचा आढावा घेतला. नवनियुक्त शिक्षकांना भविष्यात कोणतीही अडचण किंवा गरज भासल्यास शिक्षक संघ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास धामणे यांनी आपल्या मनोगतातून नव्या शिक्षकांना अनुभवाधारित मार्गदर्शन केले.
प्रमुख उपस्थिती असलेल्या गटशिक्षणाधिकारी गायत्री माने यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांनी आपले संपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन केले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असल्याचे त्यांनी नमूद केले. विस्तार अधिकारी संदीप कंदुरकर यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. बाबाजी शिर्के यांनी प्रशासकीय कामकाजासंदर्भात उपयुक्त माहिती देत मार्गदर्शन केले, तर मामा जंगम यांनी संघटनात्मक मार्गदर्शन केले. पतपेढीचे संचालक राजेंद्र चांदिवडे यांनी पतपेढीच्या विविध योजनांची माहिती दिली.
या कार्यक्रमाला संघटनेचे तालुका नेते संतोष जाधव, सचिव संजय जाधव, कोषाध्यक्ष मारुती पाटील, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा गंभीरे, सल्लागार शिरीष भालेकर, विजय सकपाळ, गणोजी माने, विनोद आरेकर, आशिष उतेकर, माजी सचिव सचिन कुडाळकर आणि सचिन गमरे यांच्यासह माजी सैनिक शिवाजी माने व नवले सर उपस्थित होते.
महिला आघाडीच्या प्रमुख शितल देवळेकर, ऋतुजा चांदिवडे, स्मिता शिंदे, मोनार्क मोरे, सिद्धी जाधव, अंजली नवले, अंजली बनसोडे आणि सुमेरा पटेल यांनी महिला शिक्षकांचे विशेष स्वागत केले.
संघाचे उपाध्यक्ष प्रवीण कांबळे आणि काशिनाथ मोर्डेकर यांच्यासह संतोष गांगरकर, सुभाष बारगुडे, रवींद्र पाबे, मंगेश झावरे आणि वीरेंद्र गावित यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. राहुल तुगावकर यांनी कार्यक्रमाचे छायाचित्रण केले.
सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. संदीप घाणेकर यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले. संजय जाधव यांनी आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.


