(रत्नागिरी / वार्ताहर)
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या भूगोल विभागामार्फत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) भूगोल विभागातील खडक संग्रहालयाला शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. या क्षेत्रभेटीत महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी विद्यार्थ्यांना संग्रहालयातील विविध प्रकारच्या खडकांची सविस्तर माहिती दिली. खडकांचे प्रकार, पोत, रंग, रचना तसेच त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. विविध भौगोलिक परिस्थितीनुसार खडकांच्या रचनेत होणारे बदल आणि त्यामागील भौगोलिक कारणेही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे खडक प्रत्यक्ष पाहण्याबरोबरच त्यांचे नमुने हाताळण्याची आणि त्यांची रचना व वैशिष्ट्ये समजून घेण्याची संधी मिळाली. प्रत्यक्ष नमुन्यांच्या माध्यमातून खडकांची निर्मिती, त्यांचे प्रकार आणि भौगोलिक प्रदेशानुसार त्यांच्यात आढळणारे बदल विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे समजले. त्यामुळे भूगोल विषयातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासोबतच विषयाबद्दलची आवड आणि जिज्ञासाही वाढण्यास मदत झाली.
या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन भूगोल विभागप्रमुख सहा. प्रा. ऋतुजा भोवड आणि सहा. प्रा. वैष्णवी शेवडे यांनी केले. उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांचे सहकार्य लाभले.

