(लांजा/ रत्नागिरी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण राहिल्याने लांजा शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या महामार्गावरून नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत असल्याने लांजा तालुका संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली असून, यासंदर्भात पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे आणि तहसीलदार प्रियांका ढोले यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संगमेश्वर आणि पाली येथे नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र लांजा शहरात अद्याप प्रभावी सुरक्षित व्यवस्था करण्यात आलेली नाही. तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, एस.टी. डेपो, कुणबी विकास सहकारी पतपेढी, लांजा हायस्कूल, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय तसेच अन्य महत्त्वाच्या शासकीय आणि सार्वजनिक ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे.
महामार्गामुळे लांजा शहराचे दोन भाग झाले असून, हजारो नागरिकांना विविध कामांसाठी दररोज या मार्गाचा वापर करावा लागतो. विशेषतः विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, शेतकरी आणि कामगार वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे. भरधाव वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लांजा एस.टी. डेपो परिसरातील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे संघर्ष समितीने नमूद केले आहे. बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांना महामार्ग ओलांडण्यासाठी कोणतीही सुरक्षित व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्यांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. तसेच ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय ते एस.टी. डेपो आणि लांजा हायस्कूल परिसरात किमान चार ठिकाणी भुयारी मार्ग (अंडरपास), पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज) किंवा अन्य सुरक्षित पर्यायी व्यवस्था तातडीने उभारण्यात यावी, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित स्थळ पाहणी करून आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. २५ जूनपर्यंत या मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास २५ जून रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग आणि संबंधित प्रशासनाला पाठविण्यात आल्या आहेत. निवेदन सादर करताना लांजा तालुका संघर्ष समितीचे चंद्रकांत परवडी यांच्यासह प्रकाश लांजेकर, नाना मानकर, सुधाकर कांबळे, बाबा धावणे, विलास दरडे, अल्लाउद्दीन नेवरेकर, भाई चौगुले, दाजी गडहिरे, नंदकुमार आंबेकर, शांताराम आग्रे आदी उपस्थित होते.

