(लांजा)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, तालुका शाखा लांजा आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, शाखा लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा यांच्या माध्यमातून तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सराव परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांचा अनावरण सोहळा लांजा तालुका सभापती मानसीताई आंबेकर आणि उपसभापती आदेशजी आंबोळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी जि.प. सदस्या सौ. लिलाताई घडशी, पंचायत समिती सदस्या सौ. रसिका मेस्त्री तसेच श्री. खामकर उपस्थित होते.
अनावरणानंतर सराव प्रश्नपत्रिका गटशिक्षणाधिकारी श्री. सावंत व विस्ताराधिकारी चंद्रकांत पावसकर यांच्याकडे तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर वितरणासाठी सुपूर्द करण्यात आल्या. सदर सराव परीक्षा इयत्ता चौथीच्या सुमारे ६५० आणि इयत्ता सातवीच्या ५५० विद्यार्थ्यांसाठी तालुक्यातील प्रत्येक केंद्रशाळेत घेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची प्रभावी तयारी करण्यास मोठी मदत होणार आहे.
कार्यक्रमास प्राथमिक शिक्षक संघ व जुनी पेन्शन संघटना लांजा शाखेचे तालुका व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

