(लांजा /प्रतिनिधी)
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धम्म क्षेत्रात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय योगदान देणारे लांजा तालुक्यातील एन. बी. कदम यांना त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेत ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. संविधान अमृत महोत्सवानिमित्त ४ जून २०२६ रोजी संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात भिक्खू संघाचे राष्ट्रीय सचिव डॉ. ए. सुमेध बोधी आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. संघराज रुपवते यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
तेजस सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रवींद्र विठ्ठल घोसाळे यांच्या संकल्पनेतून संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे संविधान अमृत महोत्सव आणि राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून आलेल्या स्वाभिमानी आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा ऐतिहासिक ठरला. संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचे औचित्य साधून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ७५ बौद्ध उपासक-उपासिकांचा या वेळी महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भिक्खू संघाचे राष्ट्रीय सचिव डॉ. ए. सुमेध बोधी यांच्या धम्म संस्कारातून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. संघराज रुपवते होते. प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. मुकुंद भारसाकळे उपस्थित होते, तर उद्घाटक म्हणून राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार किरण लहमाटे उपस्थित होते. एन. बी. कदम यांनी १९९३ पासून सम्यक ग्रामीण विकास संस्था, बेनी खुर्द (ता. लांजा) या संस्थेच्या सरचिटणीस पदावरून सामाजिक कार्याचा प्रारंभ केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन, कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी एकपात्री अभिनय स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच व्यसनमुक्ती शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृतीचे कार्य केले.
हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी, लांजा या शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत असताना त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल जावडे येथे माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज या संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणाऱ्या दोन आश्रमशाळा आणि एका माध्यमिक विद्यालयाचे सुसज्ज शैक्षणिक संकुल उभे राहिले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही कदम यांनी उल्लेखनीय काम केले आहे. बायफ संस्था पुणे यांच्या सहकार्याने निवोशी ते शिपोशी आणि कुवे ते निवे या मार्गावर पदयात्रा काढून ‘झाडे लावा, झाडे वाचवा’ तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या उपक्रमांद्वारे जनजागृती केली. गांगेश्वर कला क्रीडा वृंद, तळवडे या संस्थेच्या सहसचिव पदावर कार्यरत असताना गावात व्यायामशाळा उभारण्यातही त्यांनी योगदान दिले.
रंगभूमी क्षेत्रातही एन. बी. कदम यांनी आपला ठसा उमटवला आहे. रुपम थिएटर रत्नागिरी, गांगेश्वर कला क्रीडा वृंद तळवडे, शिवस्वराज्य प्रतिष्ठान मुंबई, राज प्रोडक्शन लांजा, त्रिसरण मंडळ बेनी खुर्द, निलप्रिया कला मंच मुंबई, तळवडे बौद्धजन मंडळ मुंबई आणि संस्कृती फाउंडेशन लांजा या संस्थांच्या माध्यमातून विविध नाटकांमध्ये अभिनय करत त्यांनी रंगभूमीची सेवा केली आहे. गेल्या २२ वर्षांपासून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी या मातृधम्म संस्थेशी जोडलेले असलेले कदम यांनी बौद्धाचार्य प्रशिक्षण घेत संस्थेच्या संस्कार विभागाचे प्रमुख म्हणून धार्मिक आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली. २०१९ पासून ते संस्थेच्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून बौद्धाचार्य शिबिर, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर, उपासक-उपासिका शिबिर, बालसंस्कार शिबिर, व्यसनमुक्ती शिबिर, युवक-युवती मार्गदर्शन शिबिर, व्यवसाय मार्गदर्शन शिबिर अशा विविध २४ प्रकारच्या उपक्रमांद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य सुरू आहे.
वर्षावास प्रवचन मालिकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबई परिसरात विविध विषयांवर व्याख्याने देऊन त्यांनी धम्म आणि सामाजिक जागृतीचे कार्य केले आहे. तसेच शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयांवर व्याख्याने देऊन विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवणूक करण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. गरीब विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश उपलब्ध करून देणे तसेच गरजू आणि अनाथ मुलांना शिक्षणासाठी मदतीचा हात देण्याचे कार्यही त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. सध्या एन. बी. कदम हे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरीचे सरचिटणीस, राजयोग पार्क गृह निर्माण सोसायटीचे संचालक, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे शालेय समितीचे सदस्य आणि तळवडे विकास सोसायटीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
यापूर्वी त्यांना समता कला मंच संगमेश्वरतर्फे ‘धम्मरत्न’ आणि ‘धम्मभूषण’ पुरस्कार, लांजा तालुका मुख्याध्यापक संघाचा आदर्श कर्मचारी पुरस्कार तसेच २०२३ मध्ये इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी आणि नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगावी यांच्याकडून राष्ट्रीय सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एन. बी. कदम यांच्या प्रदीर्घ सामाजिक, शैक्षणिक आणि धम्म कार्याची दखल घेत तेजस सेवा प्रतिष्ठान, संगमनेर यांनी त्यांना ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६’ देऊन गौरविले आहे. या सन्मानाबद्दल समाजातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

