(लांजा)
तालुक्यातील निवसर मळेवाडी येथे एका रात्रीत दोन घरफोडीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्याने दोन घरांचे दरवाजे आणि कपाटांचे लॉकर फोडून एकूण ४४ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या दुहेरी घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना ७ नोव्हेंबरच्या रात्री १०.३० वाजल्यापासून ८ नोव्हेंबरच्या सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली. या प्रकरणी राजेंद्र केशव शिंदे (वय ३७, रा. निवसर कानसरे मळेवाडी, ता. लांजा) यांनी लांजा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याने राजेंद्र शिंदे यांच्या घराला लागून असलेल्या दोन घरांना लक्ष्य केले.
पहिल्या घरात चोरट्याने महादेव सदू शिंदे यांच्या घराचे दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील लॉकर फोडून त्यातील ४,००० रुपये रोख रक्कम चोरली. त्यानंतर शंकर शांताराम शिंदे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील लॉकर फोडले आणि त्यातील ४०,००० रुपये रोख रक्कम लंपास केली. अशा रीतीने दोन्ही घरांतून चोरट्याने एकूण ४४,००० रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणाची नोंद लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१०/२०२५ अंतर्गत करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५(अ) (घरफोडी), ३३१(३) (चोरी) आणि ३३१(४) (तस्करी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

