(राजापूर)
राजापूर तालुक्यातील नाटे येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पोषण आहारातील तांदळाच्या १० पोत्यांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न जागरूक ग्रामस्थांनी हाणून पाडला. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री उघडकीस आला असून, पकडलेल्या गाडीत ५० किलो वजनाची १० पोती (एकूण ५०० किलो) तांदूळ आढळून आले. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक आणि दोन ग्रामस्थ अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (५ नोव्हेंबर) रात्री सुमारे ९.३० वाजता नाटेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव सुरू असताना मकरंद मधुसुदन धाक्रस (वय ३७, रा. नाटे भराडीन) हे मंदिरात उपस्थित होते. दरम्यान रात्री सुमारे १.२४ वाजता मनोज आडविरकर यांनी फोन करून त्यांना माहिती दिली की, नाटेनगर विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकरिता आलेला तांदूळ चोरून नेताना ग्रामस्थांनी एक गाडी पकडली आहे.
त्यानंतर धाक्रस यांनी शाळेचे शिपाई रविकांत भगवान धामापुरकर यांच्याशी संपर्क साधून त्वरित शाळेत पोहोचले. शाळेच्या पटांगणात अशोक लेलँड गाडी दोस्त मॉडेल (क्रमांक MH-08-AP-6927) उभी असल्याचे दिसून आले. तपासणी केली असता, गाडीत पोषण आहाराचा तांदूळ भरलेली ५० किलो वजनाची १० पोती सापडली.
सखोल चौकशीत या गाडीचा मालक कुणाल अनिल थळेश्री (रा. नाटे बांदचावाडी) असल्याचे निष्पन्न झाले, तर सुनील वसंत डुगीलकर (रा. नाटे बांदकरवाडी) हे यावेळी उपस्थित होते. ग्रामस्थांनी पोलिसांना कळविल्यानंतर दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तपासात समोर आले की, हा तांदूळ विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी आला होता.
सदर तांदळाची किंमत अंदाजे ₹७,५००, तर गाडीची किंमत सुमारे ₹३ लाख असून, एकूण ₹३,०७,५०० रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे.
मकरंद धाक्रस यांच्या लेखी तक्रारीवरून सागरी पोलीस ठाणे, नाटे यांनी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र तानू जाधव, सहाय्यक शिक्षक नाना बिरा करे, गाडीमालक कुणाल थळेश्री आणि सुनील डुगीलकर या चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 303(2), 305(d), 3(5) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 आणि 7 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा तपास सपोफौ यु. सी. पिलनकर, सागरी पोलीस ठाणे, नाटे हे करत आहेत.

