(दापोली /रत्नागिरी)
वृद्धाच्या आजारपणाचा फायदा घेत अथवा त्यांची नजर चुकवून घरातील १२ बोअरची बंदूक अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना दापोली तालुक्यातील दाभिळ येथे उघडकीस आली आहे. इसाक याकब दळवी (वय ७८, रा. दाभिळ, ता. दापोली) यांच्या मालकीची सुमारे १० हजार रुपये किमतीची बंदूक चोरीला गेल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दळवी यांनी त्यांच्या घरातील बेडरूममध्ये पलंगाच्या कोपऱ्यात १२ बोअरची सिंगल बॅरल बंदूक ठेवली होती. १ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून ३ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरातून ही बंदूक चोरून नेल्याचा आरोप आहे. दळवी यांच्या आजारपणाचा फायदा घेऊन अथवा त्यांची नजर चुकवून संबंधित व्यक्तीने स्वतःच्या फायद्यासाठी बंदूक लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चोरीस गेलेल्या बंदुकीची किंमत १० हजार रुपये असून, ती काळ्या रंगाची लोखंडी सिंगल बॅरलची १२ बोअर बंदूक आहे. तिचा क्रमांक SBBL 382/1978 असा असून, बंदुकीचा बट शिसम लाकडाचा आहे. तसेच, त्याला खाकी रंगाची नायलॉनची स्लिंग लावलेली आहे.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०५(अ) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातून बंदूक नेमकी कोणी आणि कोणत्या उद्देशाने चोरली, याचा तपास पोलीस करीत आहेत.


