( सिंधुदूर्ग / प्रतिनिधी )
देवगड समुद्रकिनाऱ्यालगत नियमांचे उल्लंघन करून पर्ससीन पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने रविवारी धडक मोहीम राबवली. या कारवाईत ‘स्वामीराज’ (IND-MH-५-MM-५२४८) ही नौका ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणण्यात आली. सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तपासणी पथक दिसताच अन्य काही पर्ससीन नौकांनी समुद्राच्या दिशेने पलायन केले.
देवगड किनाऱ्यापासून अवघ्या ३ ते ४ वाव खोल पाण्यात महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम, १९८१ मधील तरतुदींचे उल्लंघन करून अवैध मासेमारी सुरू असल्याची गोपनीय माहिती मत्स्यव्यवसाय विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तातडीने कारवाई करण्यात आली. सिंधुदुर्गच्या मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी पोलीस प्रशासन आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने ही मोहीम राबवली.
जप्त करण्यात आलेल्या ‘स्वामीराज’ नौकेची तपासणी केली असता, त्यावर २६ परप्रांतीय खलाशी कार्यरत असल्याचे आढळले. कायद्यानुसार १२ सागरी मैलांपलीकडे मासेमारी करण्यासाठी प्रवेश परवाना असतानाही ही नौका किनाऱ्याजवळ येऊन मासेमारी करत असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले. नौका बंदरात आणल्यानंतर संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला.
या कारवाईचे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी स्वागत केले आहे. किनारपट्टीवर नियमित गस्त घालून अवैध मासेमारीविरोधात सातत्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने किनारी भागातील गस्त वाढवून नियमांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास पारंपरिक मच्छीमारांचे हित जपण्यासोबतच सागरी मत्स्यसंपत्तीचे संवर्धन होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


