(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील निवळी परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम वेगाने सुरू असले तरी या कामामुळे निर्माण झालेल्या मूलभूत अडचणींकडे संबंधित महामार्ग प्राधिकरण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विकासकामांचा वेग वाढत असताना नागरिकांच्या दैनंदिन हालअपेष्टा मात्र अधिकच वाढत चालल्या आहेत.
मुख्य महामार्गावरील पुलाच्या कामामुळे अरुंद रस्ता, सततची वाहनांची वर्दळ आणि नियोजनाअभावी अनेकदा मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या रांगा लागून वाहनचालकांचा वेळ व इंधन दोन्ही वाया जात आहे. पुलाच्या कामाच्या परिसरात उडणारी धूळ ही नागरिकांसाठी गंभीर समस्या बनली आहे. रस्त्यालगतची घरे, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने दिवसभर धुळीने माखून जात आहेत. सकाळ दुपार संध्याकाळ अशा तिन्ही वेळेस पाण्याची नियमित रस्त्यावर फवारणी करणे गरजेचे असतानाही केवळ संध्याकाळच्या वेळेत रस्त्यावर पाणी दिसून येते.
दरम्यान, सर्विस रोडची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकीस्वार, रुग्णवाहिका आणि शालेय वाहनांना धोका निर्माण झाला आहे. पुलाचे काम पुढे सरकत असताना पर्यायी मार्गाची दुरवस्था मात्र महामार्ग प्राधिकरण विभागाचे लक्ष नेमके आहे कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विकासकामांसोबत सुरक्षितता, धूळ नियंत्रण आणि पर्यायी रस्त्यांची देखभाल हीदेखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र निवळी परिसरात ही जबाबदारी कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत असून, यावर आता तातडीने उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

