(अयोध्या / वृत्तसंस्था)
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरात विराजमान प्रभू श्रीरामलला यांच्या पूजा, आरती, नैवेद्य, विश्रांती आणि भाविकांच्या दर्शनाच्या वेळेत हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात आला आहे. मंदिराची सुधारित दिनचर्या रविवार, १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होणार आहे. त्यामुळे अयोध्येत दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना नव्या वेळापत्रकानुसार नियोजन करावे लागणार आहे.
सध्या मंदिराचे दरवाजे पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी उघडले जातात आणि रात्री १०:३० वाजता बंद होतात. नव्या वेळापत्रकानुसार, मंदिराचे दरवाजे पहाटे ४ वाजता उघडतील, तर रात्री १० वाजता बंद केले जातील.
मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पहाटे ४:३० ते ४:४० या वेळेत मंगला आरती होईल. त्यानंतर पहाटे ४:४० ते सकाळी ६:३० या कालावधीत प्रभू श्रीरामलला यांचा अभिषेक, शृंगार, धूप-दीप आणि नैवेद्याची तयारी केली जाईल. या वेळी गर्भगृहाचे दरवाजे बंद राहतील. सकाळी ६:३० वाजता शृंगार आरती झाल्यानंतर सकाळी ७ वाजल्यापासून भाविकांना दर्शन घेता येईल.
सकाळी ८ ते ८:१० या दहा मिनिटांच्या कालावधीत बालभोगासाठी दर्शन थांबवले जाईल. त्यानंतर सकाळी ११:३० वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील. सकाळी ११:३० ते दुपारी १२ या वेळेत राजभोग अर्पण करण्यात येईल आणि दुपारी १२ वाजता राजभोग आरती होईल. यानंतर दुपारी १२:३० ते १:३० या वेळेत प्रभू श्रीरामलला यांच्या विश्रांतीसाठी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले जाईल.
दुपारी १:३० वाजता पुजाऱ्यांचा प्रवेश आणि अल्पभोगाची प्रक्रिया पार पडल्यानंतर दुपारी १:३५ वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शन पुन्हा सुरू होईल. सायंकाळी ४ ते ४:१० या वेळेत बालभोगासाठी दर्शन तात्पुरते बंद राहील. त्यानंतर सायंकाळी ६:४५ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येईल.
सायंकाळी ६:४५ ते ७ या वेळेत धूप-दीप आणि नैवेद्य समर्पण केले जाईल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता संध्या आरती होईल. रात्री ८ ते ८:३० आणि रात्री ९:१५ ते ९:३० या दोन कालावधीत धूप-दीप व नैवेद्यासाठी मंदिराचे दरवाजे बंद ठेवले जातील. या वेळांव्यतिरिक्त भाविकांना नियमित दर्शन घेता येईल. रात्री ९:३० वाजता शयन आरती झाल्यानंतर रात्री १० वाजता मंदिराचे सर्व दरवाजे बंद करण्यात येतील.
श्रीरामलला यांच्या दर्शनासाठी अयोध्येत येणाऱ्या भाविकांनी १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होणाऱ्या सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन दर्शन आणि प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


