(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची गुरुवारी छाननी करण्यात आली. या छाननीत हातखंबा जिल्हा परिषद गटातील दोन अर्ज बाद ठरल्याने निवडणूक चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. परिणामी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दहा गटांत आता एकूण ३७ उमेदवार रिंगणात उरले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस सोमवार, २७ जानेवारी असून, त्या दिवशी निवडणुकीतील खरी स्पर्धा किती राहणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण दहा गट असून, यासाठी ३८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी झालेल्या छाननीत हातखंबा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार जनार्दन रामचंद्र जाधव यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केलेली व्यक्ती हातखंबा गटाऐवजी अन्य गटातील असल्याचे तसेच अर्जावर स्वाक्षरी नसल्याचे निदर्शनास आल्याने हा अर्ज अपात्र ठरविण्यात आला. याच गटातील माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी दाखल केलेल्या चार उमेदवारी अर्जांपैकी एक अर्ज छाननीत बाद झाला आहे. मात्र उर्वरित तीन अर्ज वैध ठरल्याने ते अद्याप निवडणूक रिंगणात कायम आहेत.
दरम्यान, पंचायत समितीच्या २० गणांसाठी एकूण ५१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, छाननीअंती सर्व अर्ज वैध ठरले आहेत. आगामी काळात किती उमेदवार माघार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीतील स्पर्धा मर्यादित ठेवण्यासाठी विविध राजकीय पक्ष व स्थानिक पातळीवर उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही चित्र दिसून येत आहे.

