(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरालगतच्या नाचणे-सावंतनगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल ४ लाख १६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (९ जून) सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही धाडसी घरफोडी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हेमंतकुमार महेंद्र चोप्रा (वय ५३, रा. आसमंत सावंतनगर-नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोप्रा हे घराबाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कडीसह उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी आणि लाकडी कपाटे फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. चोरट्यांनी घरातून सोन्याचा ४० ग्रॅम वजनाचा हार, ११.७८ ग्रॅमचे मंगळसूत्र, २० ग्रॅमच्या दोन सोन्याच्या बांगड्या, १० ग्रॅमची सोन्याची चेन, सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट, सोन्याची दोन नाणी, सोन्याचे पेंडंट, तसेच १० हजार रुपये किमतीची मोत्याची माळ, २ हजार रुपयांची कृत्रिम मोत्याची माळ आणि चांदीच्या वस्तू असा मोठा ऐवज चोरून नेला.
या घटनेनंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, पंचनामा करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, रत्नागिरी शहर परिसरात सातत्याने घडत असलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा बंद घरे लक्ष्य केली जात असल्याने पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. घरफोडीच्या या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांसमोर आता सराईत चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

