(चिपळूण / वार्ताहर )
खेरशेत–कोकरे–नायशी–कळबुशी–पेढाबे–देवपाट–रानपाट–वीर या मार्गावरील वीर गावातील सुमारे १० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. या दिरंगाईवरून जिल्हा परिषद सदस्या शिवानी सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित विभाग आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
फेब्रुवारी महिन्यात या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर सुमारे १ कोटी २४ लाख रुपयांचे अनुदानही उपलब्ध झाले आहे. तरीही चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला असून निविदा प्रक्रिया रखडल्याने स्थानिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
वीर गाव हा दुर्गम भाग असून साडेतीन ते चार हजार लोकसंख्या या मार्गावर अवलंबून आहे. शैक्षणिक, आरोग्य आणि दैनंदिन प्रवासासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून अनेक ठिकाणी खडी आणि डांबर पूर्णपणे उखडले आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे आणि मोऱ्यांची पडझड झाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही पुढील प्रक्रिया सुरू न झाल्याने शिवानी सावंत यांनी बांधकाम विभागाकडून खुलासा मागितला आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
मंजुरी असूनही काम थांबल्याने आणि कागदपत्रांमधील तांत्रिक मुद्द्यांबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याने या प्रकरणात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोपही होत आहे. पावसाळा सुरू झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असून या मुद्द्यावर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

