(पुणे)
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये स्विमिंग क्लासला जाणाऱ्या एका १३ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील हवेली तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोहण्याचे प्रशिक्षण घेत असताना घडलेल्या या घटनेत यश महेश गायकवाड (वय १३, रा. हिंगणगाव, ता. हवेली) याचा मृत्यू झाला आहे.
वडिलांच्या डोळ्यांदेखत घडला प्रकार
यशला नीट पोहता येत नसल्याने वडिलांनी स्वतः कोचला याची कल्पना देत विशेष लक्ष ठेवण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्याला फ्लोटी बेल्ट बांधून पाण्यात उतरवण्यात आले. काही वेळानंतर वडील महेश गायकवाड यांचे लक्ष गेले असता यश पाण्यात कुठेच दिसून आला नाही. घाबरलेल्या वडिलांनी तातडीने कोच आणि स्विमिंग पूल व्यवस्थापनाकडे धाव घेतली. मात्र, त्यांना तेथे अत्यंत बेजबाबदार उत्तर मिळाले. “तो कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूममध्ये गेला असावा,” असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. यानंतर स्विमिंग पूलसह, जवळपास शोध घेण्यात आला, तरीही यशचा काहीच पत्ता लागला नाही. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला.
पाण्याच्या तळाशी आढळला मृतदेह
बराच शोध घेतल्यानंतर इतर मुलांच्या मदतीने यशचा शोध सुरू करण्यात आला. काही वेळानंतर तो स्विमिंग पूलच्या तळाशी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने उरळी कांचन येथील विठ्ठल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक तपासात स्विमिंग पूलमध्ये लाईफगार्ड, सीसीटीव्ही आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी स्विमिंग पूल मालक शुभम सुरेश काकडे, त्यांचे वडील सुरेश काकडे आणि संबंधित कोच यांच्याविरुद्ध उरळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

