(मुंबई)
स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या एका वादग्रस्त शोमुळे पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. या शोमधील एका क्लिपमध्ये मुंबईतील केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टर सेजल पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केईएम हॉस्पिटल प्रशासनाने डॉक्टर सेजल पवार यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले असून तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाद नेमका कशामुळे?
प्रणीत मोरेच्या शोदरम्यान प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या डॉ. सेजल पवार यांनी वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित ‘डिसेक्शन’ प्रक्रियेवरून केलेल्या काही विधानांमुळे वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपनंतर त्यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला जात आहे. यावेळी तिने मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सवरून आक्षेपार्ह विधान केलं होतं. व्हिडिओमध्ये वैद्यकीय अभ्यासादरम्यान मृतदेहांच्या अभ्यासासंदर्भात केलेल्या या टिप्पणीवरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी हे वक्तव्य अत्यंत असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे.
या शोदरम्यान प्रणीत मोरेशी संवाद साधताना तिने सांगितले की, मेडिकल कॉलेजमध्ये संशोधन आणि मानवी शरीररचनेचा अभ्यास (डिसेक्शन) करताना दान करण्यात आलेल्या पुरुष मृतदेहांचा अभ्यास केला जातो. याच वेळी ती आणि तिच्यासोबतचे काही विद्यार्थी मृतदेहांच्या विविध भागांबाबत मस्करी करायचे आणि त्यावर जोक्स मारायचे, असे तिने नमूद केले. एका डॉक्टरकडून मृतदेहांसारख्या संवेदनशील विषयावर अशा प्रकारची टिप्पणी ऐकून स्वतः प्रणीत मोरेनेही आश्चर्य व्यक्त केले होते.
हॉस्पिटल प्रशासनाची तातडीची कारवाई
व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर केईएम हॉस्पिटल प्रशासनाने याची गंभीर दखल घेत चौकशी समिती गठीत केली आहे. उद्यापर्यंत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अहवालानंतर संबंधित डॉक्टरवर निलंबनासह पुढील कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डॉ. सेजल पवार यांची प्रतिक्रिया
वाद वाढल्यानंतर डॉ. सेजल पवार यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या वक्तव्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या याची त्यांना जाणीव झाली आहे. “माझा कोणाचाही अनादर करण्याचा हेतू नव्हता. मात्र माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला गेला आणि त्याचा परिणाम गंभीर झाला. भविष्यात मी अधिक काळजी घेईन,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी इन्स्टाग्रामवर जाहीर पोस्ट करत पुन्हा एकदा माफी मागितली आहे.
सोशल मीडियावर संताप
या वक्तव्यावर डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि सोशल मीडिया युजर्सनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मृत्यूनंतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी आपले शरीर दान करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान राखणे आवश्यक असल्याचे अनेकांनी स्पष्ट केले. अशा संवेदनशील विषयांवर हलक्याफुलक्या किंवा आक्षेपार्ह टिप्पणीमुळे शरीरदानासारख्या महत्त्वाच्या उपक्रमाबाबत समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशीही चिंता काहींनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील संवेदनशील विषयावर केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

