(संगमेश्वर / एजाज पटेल)
ग्रामीण भागात चोरट्यांचे वाढते धाडस आणि दुसरीकडे महावितरणचा निष्काळजी कारभार, अशा दुहेरी परिस्थितीमुळे संगमेश्वर तालुक्यातील मांजरे कोपरखरी परिसर पुन्हा चर्चेत आला आहे. विद्युत रोहित्रातील किमती तांब्याच्या वायरची चोरी झाल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल होऊनही संबंधित रोहित्रे दीर्घकाळ बेवारस अवस्थेतच पडून होती.
जाकादेवी उपकेंद्राच्या अखत्यारीतील या भागात गेल्या काही वर्षांत नादुरुस्त रोहित्रे बदलण्यात आली होती. मात्र, नियमांनुसार जुने आणि खराब साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याऐवजी ते जंगलातच उघड्यावर टाकण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ही महागडी शासकीय मालमत्ता दीड ते दोन वर्षे असुरक्षित अवस्थेत पडून राहिली.
चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक लाईनमनने वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, गुन्हा दाखल होऊनही उर्वरित रोहित्रे आणि धोकादायक स्थितीत असलेले साहित्य तिथेच ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
या निष्काळजीपणाचा गैरफायदा घेत चोरट्यांनी एका रोहित्रातील तांब्याचे वायडिंग लंपास केले, तर दुसऱ्या रोहित्रावरही तोडफोडीचा प्रयत्न झाला. ही बाब समोर आल्यानंतर परिसरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, प्रसारमाध्यमांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर महावितरण प्रशासनाने हालचाल करत तिन्ही रोहित्रे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवली आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे केवळ मालमत्तेचे नुकसानच नाही तर पोलिस यंत्रणेवरही अतिरिक्त ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे. स्वतःच्या मालमत्तेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून नंतर पोलिसांकडे तक्रार करण्याची वेळ येत असल्याने प्रशासनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक पातळीवर या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

