(सातारा)
बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांचे विश्वासू सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, त्याच वेळी विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांनी आपल्या पहिल्याच दौऱ्यात संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला. कराड येथील प्रितीसंगम येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर दर्शन घेतल्यानंतर त्यांनी तरडगाव (ता. फलटण) येथे जाऊन दिवंगत विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
या भेटीत सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांची आपुलकीने विचारपूस केली. मुलांच्या डोक्यावर मायेने हात ठेवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्यासोबत आहे,” असा शब्द देत त्यांनी कुटुंबीयांना आधार दिला. स्वतःवर दुःखाचा मोठा आघात झालेला असतानाही त्यांनी अत्यंत संयमाने जाधव कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला. या भावनिक क्षणांनी उपस्थितांचे डोळे पाणावले.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही तरडगाव येथे जाऊन जाधव कुटुंबीयांची भेट घेतली होती. “अजितदादांच्या निधनाने जसा महाराष्ट्र दुःखात आहे, तसाच विदीप जाधव यांच्या कुटुंबावरही मोठा आघात झाला आहे. या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत,” असे त्यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले. तसेच, विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याची घोषणाही रोहित पवार यांनी केली आहे.
या संपूर्ण घटनाक्रमातून केवळ राजकीय नव्हे, तर नात्यांची जपणूक आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

