(मुंबई)
आखाती देशांतील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारतातील इंधन पुरवठ्यावर दिसू लागला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक अडथळ्यांमुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक भागांत पेट्रोल आणि डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, राज्यातील इंधनसाठ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘राज्याकडे फक्त एक महिन्याचा साठा’ : छगन भुजबळ
पत्रकार परिषदेत बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील सध्याच्या इंधन परिस्थितीबाबत महत्त्वाचे विधान केले. त्यांनी सांगितले की, सरकारकडे सध्या केवळ एक महिना पुरेल एवढाच पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे.
भुजबळ म्हणाले की, इंधन टंचाईचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नाही, तर तो जागतिक स्तरावर गंभीर बनला आहे. इराण, अमेरिका आणि इतर देशांमधील राजकीय संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा फटका युरोप, जपान आणि अमेरिकेलाही बसत असून अनेक देशांमध्ये इंधन दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पर्यायी देशांमधून इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताची परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी नागरिकांनी काही प्रमाणात संयम बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘पॅनिकमुळे सप्लाय चेन विस्कळीत होते’ : देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारकडे पेट्रोल-डिझेलचा पुरेसा स्ट्रॅटेजिक साठा उपलब्ध आहे आणि पुरवठा सुरळीत सुरू आहे.
फडणवीस म्हणाले की, नागरिकांनी भीतीपोटी गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करण्यास सुरुवात केल्यास सप्लाय चेनवर ताण येतो. प्रत्येक शहर, तालुका आणि पेट्रोल पंपासाठी रोजच्या वापरानुसार पुरवठा साखळी तयार केलेली असते. मात्र अचानक मोठ्या प्रमाणावर इंधन खरेदी झाल्यास वितरण व्यवस्थेवर परिणाम होतो. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, एखाद्या बँकेत सर्व लोकांनी एकाच दिवशी पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर तात्पुरती अडचण निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे पेट्रोल पंपांवरही परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी गरजेनुसारच इंधन खरेदी करावे आणि अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्रातील अनेक भागांत पेट्रोल पंपांवर रांगा
इंधन टंचाईच्या चर्चांमुळे मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे दिसून आले. काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल संपल्याच्या अफवांमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्यास सुरुवात केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक तणाव आणि पुरवठा अडथळ्यांमुळे आगामी काही दिवस परिस्थिती महत्त्वाची ठरणार असून सरकारकडून सातत्याने पुरवठा व्यवस्थेवर लक्ष ठेवले जात आहे.

