(बदलापूर)
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर परिसरात धक्कादायक दुहेरी हत्या प्रकरण समोर आले असून जुवेली गावाजवळ बंद कारमध्ये एका महिला आणि ओला चालकाचे रक्तबंबाळ मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोघांच्याही शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळल्याने पोलिसांनी दुहेरी हत्येच्या अँगलने तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुवेली गावाजवळ उभी असलेल्या एका कारमध्ये दोन मृतदेह असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी बदलापूर पूर्व पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता कारमध्ये एका महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. दोघांच्याही अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
पोलिसांनी मृतांची ओळख पटवली असून मृत महिला मनीषा भोसले तर मृत पुरुष ओला चालक ज्योतिबा शिंदे असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोघे ओला कारमधून बदलापूरमध्ये आल्याची माहिती समोर आली असून ते बदलापूर का आले होते, याचाही तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मनीषा भोसले या जुवेली गावात राहत होत्या. तर ओला चालक ज्योतिबा शिंदे हे घाटकोपर येथील रहिवासी होते. मनीषा यांच्या पतीचा घाटकोपर येथे चहाच्या व्यवसाय आहे.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मनीषा भोसले यांच्या तीन वर्षांच्या मुलाने “माझ्या आईला ओला चालकाने मारले,” असा जबाब दिल्याची माहिती समोर आली असून या जबाबामुळे तपासाला नवे वळण मिळाले आहे. हे दुहेरी हत्याकांड झाले त्यावेळी मनीषा यांचा तीन वर्षांचा मुलगा कारमध्येच होता. “आईची हत्या चालक काकांनी केली”, अंस त्या तीन वर्षाच्या मुलानं पोलिसांना सांगितल्याचं समजते. पण त्यानंतर चालक ज्योतिबा शिंदे याचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत पोलीस तपास सुरु आहे. ओला चालक ज्योतिबा शिंदे याचा मृत्यू नेमका कसा झाला? त्याची हत्या कोणी केली? की या प्रकरणामागे वेगळे कारण आहे? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीनं पोलिसांना दिली. त्यानंतर बदलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला.
दरम्यान, उल्हासनगर झोन 4 चे डीसीपी सचिन गोरे यांनी सांगितले की, “घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. हे दुहेरी हत्याकांड आहे की, ओला चालकाने महिलेची हत्या करून स्वतः आत्महत्या केली, हे पुढील तपासात स्पष्ट होईल.”
या घटनेमुळे बदलापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

