( रत्नागिरी /प्रतिनिधी )
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे खून प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा वैद्यकीय कारणावर आधारित जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळून लावत न्यायालयीन प्रक्रियेला प्राधान्य दिले आहे. मात्र, आरोपीच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपचार व्यवस्था पोलिसांच्या देखरेखीखाली उपलब्ध करून देण्याचा मार्गही न्यायालयाने स्पष्ट केला आहे.
यापूर्वी आंबेरकर यास सहा आठवड्यांचा अल्पकालीन जामीन मंजूर करण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर कारागृहात हजर होताच आरोपीने पुन्हा एकदा वैद्यकीय कारण पुढे करत चार महिन्यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तथापि, सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालांचा सखोल विचार केल्यानंतर न्यायालयाने तातडीने बाहेर उपचारासाठी पाठविण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. प्रकरणातील गांभीर्य अधोरेखित करताना न्यायालयाने नमूद केले की, भादंवि कलम ३०२ अंतर्गत नोंद असलेल्या या खटल्यात आरोपीविरुद्ध गंभीर आरोप असून, त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही विचार आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जामीन मंजूर केल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची किंवा आरोपी फरार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हा सरकार पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला आहे.
दरम्यान, वैद्यकीय तपासण्यांमध्ये आरोपीला किडनी स्टोन व पित्ताशयातील खडे असल्याचे निदर्शनास आले असले, तरी या आजारांवर उपचार कारागृह प्रशासन व पोलिसांच्या देखरेखीखाली शक्य असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गंभीर स्वरूपाची वैद्यकीय गरज भासल्यास आरोपीला आवश्यक त्या खासगी रुग्णालयात हलविण्याची मुभा पोलिस यंत्रणेला देण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयातून एकीकडे गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना दिल्या जाणाऱ्या सवलतींबाबत कठोर भूमिका अधोरेखित झाली असताना, दुसरीकडे मानवी दृष्टीकोन राखत वैद्यकीय उपचारांची हमीही सुनिश्चित करण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

