( शिर्डी )
साईबाबांप्रती असलेली निस्सीम श्रद्धा आणि भक्ती पुन्हा एकदा शिर्डीच्या साईदरबारात पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील एका दानशूर साईभक्ताने साईबाबांना हिऱ्यांनी जडवलेला सुवर्ण ब्रोच अर्पण करत साई संस्थानला रोख देणगीही दिली आहे. विशेष म्हणजे या भाविकाने एकूण सुमारे 24 लाख रुपयांचे दान केले असून स्वतःची ओळख गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे.
शिर्डीतील साईबाबा मंदिरात दरवर्षी लाखो भाविक विविध स्वरूपात दान देत असतात. या परंपरेला पुढे नेत दिल्लीतील एका साईभक्ताने साईबाबांच्या श्रृंगारासाठी खास सुवर्ण ब्रोच अर्पण केला आहे.
15 लाखांचा हिऱ्यांनी जडवलेला सुवर्ण ब्रोच
साई संस्थानच्या माहितीनुसार, सुमारे 80 ग्रॅम सोन्यापासून तयार करण्यात आलेल्या या ब्रोचवर नॅचरल डायमंडसह मौल्यवान रत्न जडवण्यात आले आहेत. या रत्नजडित सुवर्ण ब्रोचची अंदाजे किंमत 15 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. साईबाबांच्या काकड आरती, मध्याह्न आरती आणि इतर धार्मिक विधींवेळी करण्यात येणाऱ्या दैनंदिन श्रृंगारामध्ये हा विशेष ब्रोच वापरण्यात येणार आहे. त्यामुळे साईबाबांच्या अलंकारांमध्ये आणखी एका मौल्यवान वस्तूची भर पडली आहे.
9 लाख रुपयांची रोख देणगीही अर्पण
सुवर्ण ब्रोचसोबतच संबंधित भाविकाने साई संस्थानला 9 लाख रुपयांची रोख देणगीही दिली आहे. त्यामुळे या दानाची एकूण रक्कम जवळपास 24 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मात्र एवढ्या मोठ्या देणगीनंतरही संबंधित भाविकाने प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून आपले नाव किंवा वैयक्तिक माहिती जाहीर करू नये, अशी विनंती संस्थानकडे केली आहे.
साईदरबारातील दानशूर परंपरा कायम
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात देश-विदेशातून येणारे भाविक श्रद्धेनुसार सोने, चांदी, रोख रक्कम तसेच विविध मौल्यवान वस्तू अर्पण करत असतात. साईबाबांवरील अढळ विश्वास आणि भक्तीमुळे आजही अनेक भाविक निस्वार्थ भावनेने दान करत असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

