(मुंबई)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून 23 नोव्हेंबर रोजी राज्यातील 1,423 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत संपूर्ण प्रक्रियेत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली होती. प्रश्नपत्रिका छपाईपासून उमेदवारांच्या हातात पोहोचेपर्यंत कुठेही गोपनीयतेचा भंग झाल्याची एकही तक्रार प्राप्त झालेली नाही, असे स्पष्टीकरण राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले.
कोल्हापूरमध्ये टीईटी पेपरफोडीच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद झाल्यानंतर निर्माण झालेल्या संभ्रमावर परीक्षा परिषदेने स्पष्ट भूमिका मांडली. या घटनेचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेसोबत कोणताही संबंध नसल्याचे ओक यांनी म्हटले आहे.
कडक गोपनीयतेत TET प्रश्नपत्रिकांची संपूर्ण प्रक्रिया
- प्रश्नसंच तज्ञांकडून पूर्ण गोपनीयतेत तयार करून, स्वतंत्र पाकिटात सीलबंद केले जातात.
- निवडलेल्या संचाची छपाई गोपनीय प्रेसमध्ये केली जाते.
- छापलेल्या प्रश्नपत्रिका वर्गखोलीनिहाय पाकिटात पॅक करून केंद्रनिहाय बॉक्सेस सिलबंद केले जातात.
- हे बॉक्सेस सिलबंद वाहनातून जिल्हा कस्टडीमध्ये पाठवले जातात.
- जिल्ह्यात ही कस्टडी सामान्यतः जिल्हा कोषागार, सीसीटीव्ही निगराणी आणि शस्त्रसज्ज पोलीस बंदोबस्तात ठेवली जाते.
प्रश्नपत्रिका स्वीकारताना बॉक्सेस सिलबंद आहेत का? वाहन सिलबंद होते का? याची कडक तपासणी करूनच साहित्य कस्टडीमध्ये घेतले जाते.
परीक्षेच्या दिवशीची काटेकोर कार्यवाही
- जिल्हा परिरक्षक आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंगसह केली जाते.
- झोनल ऑफिसर प्रश्नपत्रिकांचे बॉक्स केंद्रावर नेण्याचा संपूर्ण प्रवासही रेकॉर्ड केला जातो.
- केंद्रावर ब्लॉकनिहाय पाकिटे वाटल्यानंतर ही पाकिटे परीक्षार्थ्यांच्या समोरच उघडली जातात.
एकही तक्रार नाही – परिषदेतर्फे स्पष्टता
राज्यभरातील कोणत्याही केंद्रातून सिलबंद वाहन न येणे, प्रश्नपत्रिकांचे बॉक्स किंवा पाकिटे सीलबंद नसणे, कस्टडी प्रक्रियेत त्रुटी अशा तक्रारी एकाही ठिकाणाहून प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया नियमांनुसार आणि काटेकोरपणे पार पडल्याचे आयुक्त ओक यांनी ठामपणे नमूद केले आहे. कोल्हापूरमध्ये पकडलेली टोळी स्वतंत्र गुन्हेगारी कृतीत सामील असून, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा या पेपरफुटी प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, असा निष्कर्ष परिषदेतर्फे जाहीर करण्यात आला आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरणात मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड (रा. बेलवाडी, ता. कराड) याच्यासह नऊ जणांना सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने मुरगूड पोलिसांच्या मदतीने अटक केली. अटक करण्यात आलेल्या सर्वांना कागल प्रथमवर्ग न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 18 जणांना अटक झाली आहे.
पोलिस तपासात उघड झाले आहे की या टोळीने टीईटी परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वी उपलब्ध करून देऊ, असा दावा करून अनेक परीक्षार्थींपासून मूळ शैक्षणिक कागदपत्रे, रोख रक्कम आणि कोरे धनादेश घेतले. या बहाण्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी महेश गायकवाड याचा शोध रविवारीपासून सुरू होता. अखेर पोलिसांनी त्याला कराड येथे अटक केली. त्यानंतर सोमवारी खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले:
- अमोल पांडुरंग जरग (38, रा. सरवडे, ता. राधानगरी; सध्या रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कोल्हापूर)
- स्वप्निल शंकर पोवार (35, रा. कासारपुतळे, ता. राधानगरी)
- रणधीर तुकाराम शेवाळे (46, रा. सैदापूर, ता. कराड)
- तेजस दीपक मुळीक (22, रा. निमसोड, ता. कडेगाव, जि. सांगली)
- प्रणय नवनाथ सुतार (32, रा. खोजेवाडी, जि. सातारा)
- संदीप शिवाजी चव्हाण (40, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड)
- श्रीकांत नथुराम चव्हाण (43, रा. विद्यानगर, कराड; सध्या रा. उंबज, ता. कराड)
या सर्वांना न्यायालयीन कारवाईनंतर एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या टोळीने ज्या परीक्षार्थींपासून मूळ कागदपत्रे व पैसे घेतले, अशी अनेकांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. पोलिस त्यांचा शोध घेत असून, पुढील चौकशीत आणखी नवे बळी आणि आरोपी समोर येण्याची शक्यता अधिक आहे.

