(मुंबई)
कोकणात विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही उद्योग व शासकीय प्रकल्पांचे विकेंद्रीकरण चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप करत विविध संघटनांनी ‘कोकणची कैफियत’ या परिसंवादाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम उद्या शनिवार 13 जून रोजी दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातील प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृहात सायंकाळी 5 ते 8 या वेळेत होणार आहे. जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्ष, कोकण जनविकास समिती आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिसंवादात कोकणातील विकास धोरणांवर चर्चा होणार आहे.
आयोजकांच्या मते, काजू उत्पादनात कोकण आघाडीवर असतानाही काजू बाजारपेठ पश्चिम महाराष्ट्रात उभारली जात आहे. तसेच समुद्रकिनाऱ्यामुळे मासेमारी मोठ्या प्रमाणात कोकणात होत असताना मत्स्य विज्ञान विद्यापीठ मात्र नागपूरमध्ये स्थापन करण्यात आले आहे. या निर्णयांमुळे कोकणातील स्थानिक अर्थव्यवस्थेला धक्का बसत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्य सरकारने कोकणातील देवगडसह तीन ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली असून या निर्णयालाही स्थानिक पातळीवर विरोध होत आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा मुद्दा अद्याप प्रलंबित असतानाच नव्या प्रकल्पांमुळे चिंता वाढल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
परिसंवादात अणुऊर्जा अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. मंगेश सावंत हे अणुऊर्जा आणि सौर ऊर्जेच्या तुलनेवर मार्गदर्शन करणार आहेत. आयोजकांच्या मते, सौर ऊर्जा प्रकल्प कमी खर्चात आणि जलद पूर्ण होऊ शकतात, तसेच दीर्घकालीन वीजदरही कमी राहू शकतो.
याशिवाय, लोटे येथे सुरू करण्यात आलेल्या “फॉरएव्हर केमिकल्स” (PFAS) प्रकारच्या घातक रसायन प्रकल्पालाही विरोध व्यक्त केला जाणार आहे. इटलीत बंद करण्यात आलेल्या या रसायन उत्पादनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या विषयावर केमिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक प्रा. सुरेश रानडे आपले मत मांडणार आहेत.
या परिसंवादात जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रभाकर नारकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लव्हेकर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी आपले विचार मांडतील.

