(नाशिक)
गंगापूर धरण परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेत तीन अल्पवयीन मुलांसह एका विवाहित महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे नाशिक शहरासह सावरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सावरगाव परिसरातील तीन मुले आणि एक विवाहित महिला गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर भागात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना पाण्यात उतरण्याचा मोह झाला, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने एकजण खोल पाण्यात जाऊन बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर तिघेही पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले आणि चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने गंगापूर पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या बचाव पथकाने शोधमोहीम राबवून चौघांचे मृतदेह बाहेर काढले.
या दुर्घटनेत मयुरी पवन जाधव (वय २२, रा. अंजनेरी, त्र्यंबकेश्वर), गणेश सुरेश गोतरने (वय १६), निखिल मच्छिंद्र गौतरणे (वय १५) आणि साहिल मनोहर गोतराने (वय १६, सर्व रा. सावरगाव, ता. नाशिक) यांचा मृत्यू झाला आहे. मृत तिघे अल्पवयीन एकमेकांचे सख्खे चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांनी गंगापूर धरण परिसरात धाव घेतली. आपल्या लेकरांचा मृतदेह पाहून कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्याही डोळ्यात अश्रू आले. दरम्यान, गंगापूर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरण परिसरातील पाण्याची पातळी वाढलेली असते. तसेच पाण्याचा प्रवाहही तीव्र असतो. त्यामुळे नागरिकांनी धरण परिसरात पाण्यात उतरणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गंगापूर धरण परिसरात यापूर्वीही अशा दुर्घटना घडल्या असून सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

