(पुणे)
पुण्यातील पिंपरी चिंचवड शहर अठरा वर्षीय तरुणीच्या हत्येनं हादरलं आहे. वाल्हेकरवाडी परिसरात या तरुणीची भर रस्त्यात धारदार शस्त्रानी वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. तर आरोपींना पकडण्यात आता पोलिसांना यश आलं आहे.
दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी कोमल नावाच्या 18 वर्षीय तरुणीला घराबाहेर बोलवत थेट सपासप वार करत संपवलं. कोमल भरत जाधव असं या 18 वर्षीय मृत तरुणीच नाव आहे. ती तिच्या आई आणि भावासह वाल्हेकरवाडी परिसरात वास्तव्यास होती. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या या तरुणीवर कृष्णाई कॉलनी मध्ये धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी हे वार केले आणि सुसाट वेगात हे दोघेही फरार झाले.
हे वार वाल्हेकरवाडी येथील भर चौकात झाले होते. त्यानंतर कोमल रक्ताच्या थारोळ्यात काही काळ पडून होती. दरम्यान स्थानिकांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांनी घोषित केलं. कोमलची हत्या करून पळून जाणारे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. मात्र त्यांचे चेहरे दिसत नसल्यामुळे आरोपींची ओळख पटवणे पोलिसांसाठी अवघड होतं.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लगेचच आरोपींचा माग काढायला सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी जिल्ह्यात फील्डिंग लावून या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळवलं आहे. चिंचवड पोलिसांचे डीबी स्कॉड, गुंडविरोधी पथक, तपास पथक यांनी सीसीटीव्ही च्या माध्यमातून तपास करत आरोपींचा अवघ्या काही तासात छडा लावला. त्यातूनच मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही आरोपी मुळचे दिल्लीचे आहेत. त्याचबरोबर मयत कोमल आणि आरोपी हे आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते.
आरोपींनीच कोमलला घराबाहेर बोलावलं होतं, त्यानंतर त्यांनीच तिच्यावर वार केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र या हत्येमागचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. परंतु या हत्येमुळे पुण्यात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या हत्येचा पोलीस कसोशीने तपास करीत आहेत.

