(मुंबई)
क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषकात खेळताना दिसण्याची शक्यता आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2027 स्पर्धा 4 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर 2027 दरम्यान दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे संयुक्तपणे आयोजित करण्यात येणार आहे. सुमारे दीड महिना चालणाऱ्या या भव्य स्पर्धेत एकूण 54 सामने खेळवले जाणार असून जगातील 14 अव्वल संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे 2027 चा विश्वचषक 2023 च्या स्पर्धेपेक्षा पूर्णपणे वेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे.
आयसीसीने 2003 विश्वचषकाच्या धर्तीवर नवीन स्पर्धा रचना तयार केली आहे. यात 14 संघांना प्रत्येकी सात संघांच्या दोन गटांत विभागले जाईल. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ ‘सुपर सिक्स’ फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर सुपर सिक्समधील टॉप चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना 21 नोव्हेंबर 2027 रोजी खेळवला जाणार आहे.
या स्पर्धेचे मुख्य यजमान दक्षिण आफ्रिका असणार असून बहुतेक सामने तेथील आठ प्रमुख स्टेडियममध्ये खेळवले जातील. जोहान्सबर्गमधील वँडरर्स स्टेडियम, केप टाऊनमधील न्यूलँड्स आणि डर्बनमधील किंग्समीड स्टेडियम येथे महत्त्वाचे सामने होण्याची शक्यता आहे.
झिम्बाब्वेमधील हरारे आणि बुलावायो येथेही सामने आयोजित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे नामिबिया प्रथमच मोठ्या आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवणार असून तेथे दोन मैदानांवर सामने खेळवले जातील. यजमान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांना थेट प्रवेश मिळाला आहे. तसेच आयसीसी क्रमवारीतील अव्वल आठ संघही थेट पात्र ठरणार आहेत. मात्र नामिबियाला यजमान असूनही पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. उर्वरित जागांसाठी पात्रता स्पर्धेत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, 2023 विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाची आठवण मागे टाकत भारतीय संघ 2027 मध्ये नवा इतिहास घडवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

