(मुंबई)
राज्यातील इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नींच्या पाल्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. प्रत्येक शिक्षण मंडळातील अशा गुणवंत विद्यार्थ्यांपैकी पहिल्या पाच जणांना प्रत्येकी १०,००० रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.
या उपक्रमासाठी इच्छुक पाल्यांनी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहरातील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. संपर्कासाठी ०२२-३५१८३८६१ / ८५९१९८३८६१ हे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध आहेत.
फक्त शैक्षणिक यशच नव्हे, तर प्रसिद्ध शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांना देखील विशेष गौरव देण्यात येणार आहे. IIT, IIM, AIIMS यांसारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांना २५,००० रुपयांचा गौरव पुरस्कार देण्यात येईल. यासोबतच कला, क्रिडा, संगीत, नृत्य, उद्योजकता आणि संगणक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सामाजिक जबाबदारी पार पाडणारे, देश-राज्याच्या प्रतिष्ठेस हातभार लावणारे माजी सैनिक, त्यांची पत्नी आणि पाल्यांनाही या योजनेत सन्मानित करण्यात येईल. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना विशेष सन्मान दिला जाणार आहे.
या उपक्रमामुळे माजी सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांना ना केवळ आर्थिक मदत मिळणार आहे, तर त्यांच्या मेहनती, कर्तृत्व व योगदानाची सरकारी पातळीवर सार्वजनिकरित्या दखल घेतली जाणार आहे. हे पुरस्कार युवकांना प्रोत्साहन देणारे आणि माजी सैनिकांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे ठरणार आहेत.

