(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, आतापर्यंत अडगळीत आणि रुग्णांच्या नजरेआड असलेला केस पेपर विभाग आता रुग्णालयाच्या दर्शनी भागात स्थलांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा वेळ वाचण्यास मदत होत असून या बदलाचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना केस पेपर विभाग शोधण्यासाठी रुग्णालयाच्या आतील भागात जावे लागत होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग रुग्ण तसेच जिल्ह्याबाहेरून उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. सांगवीकर यांनी रुग्णकेंद्रित दृष्टीकोनातून केस पेपर विभाग रुग्णालयाच्या समोरील भागात आणण्याची संकल्पना मांडली. या निर्णयानुसार अपघात विभागासमोरील जागेत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून नव्या विभागाची उभारणी करण्यात आली. गेल्या महिनाभरात काम पूर्णत्वास नेण्यात आले असून आता हा विभाग कार्यान्वित झाला आहे.
केस पेपर विभागासोबतच औषध वितरण विभागही त्याच परिसरात स्थलांतरित करण्यात आला आहे. याशिवाय १०८ रुग्णवाहिका सेवेसाठी स्वतंत्र कक्ष तसेच पोलिस चौकीसाठीही आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयात प्रवेश करताच नागरिकांना आवश्यक सेवा सहज उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी केस पेपर काढण्यासाठी रुग्णांना अपघात विभागाच्या बाजूने जाऊन इमारतीच्या आतील भागात जिना चढून जावे लागत होते. तसेच पोलिस चौकीही अपघात विभागाच्या मागील बाजूस असल्याने ती शोधण्यासाठी नागरिकांची दमछाक होत होती. नव्या व्यवस्थेमुळे या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत.
रुग्णालयातील महत्त्वाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ, श्रम आणि त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी ही सुविधा दिलासादायक ठरत असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
वैद्यकीय अधीक्षकांची बारकाव्यांवरही विशेष नजर
जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा अधिक परिणामकारक आणि रुग्णाभिमुख करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांनी केवळ मोठ्या बदलांपुरते स्वतःला मर्यादित ठेवलेले नाही. रुग्णांना दैनंदिन स्तरावर भेडसावणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणींचाही त्यांनी गांभीर्याने विचार केला आहे. केस पेपर विभाग सहज दिसेल अशा ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय हे त्याचेच एक उत्तम उदाहरण मानले जात आहे.
रुग्णालयात प्रथमच येणाऱ्या रुग्णांना कोणता विभाग कुठे आहे, याचा शोध घेण्यात वेळ वाया जाऊ नये, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना अनावश्यक पायपीट करावी लागू नये, यासाठी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक बदल सुचवले. रुग्णांच्या सोयीसाठी सेवा अधिक सुलभ आणि सहज उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असून, प्रशासनातील या संवेदनशील दृष्टिकोनाची नागरिकांकडूनही दखल घेतली जात आहे.

