(रत्नागिरी)
शहरातील आठवडा बाजार परिसरात काँग्रेस भवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवार (दि. २७) रात्री साडेआठच्या सुमारास एक बैल रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या उघड्या खड्ड्यात (चेंबरमध्ये) अडकून पडल्याची घटना घडली. सुदैवाने परिसरातील शिवभक्त आणि नागरिकांनी तत्परता दाखवत सदर बैलाला सुखरूप बाहेर काढले. या घटनेत कोणतीही गंभीर दुखापत झाली नसली, तरी शहरातील सुरू असलेल्या रस्ते कामांतील निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात उघडे चेंबर दिसून न आल्याने बैल त्यात अडकला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत त्याची सुरक्षित सुटका केली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित यंत्रणांच्या ढिसाळ नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की, शहरात अनेक ठिकाणी रस्ते, गटारे आणि चेंबरची कामे सुरू असून अनेक ठिकाणी उघडे खड्डे तसेच अपुरी सुरक्षा व्यवस्था असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. आज एका मुक्या प्राण्याचा जीव थोडक्यात बचावला, मात्र उद्या एखादे लहान मूल, ज्येष्ठ नागरिक किंवा वाहनचालक अशा खड्ड्यात पडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुरू असलेली रस्ते व गटारांची कामे तातडीने पूर्ण करावीत, काम सुरू असलेल्या ठिकाणी मजबूत बॅरिकेड्स, धोक्याचे इशारा फलक आणि रात्रीच्या वेळी लाल दिव्यांची व्यवस्था करावी. तसेच उघडी चेंबर्स तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षितपणे झाकावीत आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
“मुक्या प्राण्यांचा जीव वाचवणे हीच खरी ईश्वरसेवा आहे,” असे सांगत समस्त शिवभक्त आणि प्राणीप्रेमी नागरिकांनी नगर परिषदेला या घटनेकडे गांभीर्याने पाहून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

