(गुहागर / रत्नागिरी प्रतिनिधी)
गुहागर तालुक्यातील धोपावे बंदर परिसरात महावितरणच्या भूमिगत वीज केबलच्या कामातील कथित निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नवीन भूमिगत वीज केबलच्या डीपीमधून विद्युत प्रवाह उतरल्याने एका गाईचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. ११ जून) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर महावितरणच्या कामाच्या दर्जावर आणि देखरेखीवर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
धोपावे बंदर परिसरात नुकतेच भूमिगत वीज केबल टाकण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, हे काम नियम आणि सुरक्षिततेच्या निकषांना बगल देऊन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. गावातील वाडी-वस्तीच्या जवळ असलेला वीज वितरणाचा डीपी नागरिक, वाहने आणि जनावरांच्या सतत वर्दळीच्या ठिकाणी आहे. अशा संवेदनशील ठिकाणी सुरक्षेची खबरदारी घेणे अपेक्षित असताना झालेल्या हलगर्जीपणामुळे एका मुक्या जनावराचा जीव गेला आहे.
भूमिगत केबल टाकताना केवळ कागदोपत्री उपाययोजना करण्यात आल्याचे चित्र आहे. केबल सुरक्षितपणे जमिनीत गाडण्याऐवजी अनेक ठिकाणी ती उघडीच राहिल्याने परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित कामाची गुणवत्ता आणि देखरेखीबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एका निष्पाप गाईचा जीव गेल्यानंतरही जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर भविष्यात एखाद्या नागरिकाच्या जीवावर बेतल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून उघड्यावर असलेल्या वीज केबल सुरक्षित कराव्यात, कामाची चौकशी करावी आणि निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदार तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मुक्या जनावराचा बळी गेल्यानंतर तरी महावितरण प्रशासन जागे होणार का? की आणखी एखाद्या दुर्घटनेची प्रतीक्षा केली जाणार, असा सवाल आता धोपावेकरांकडून केला जात आहे.

