(रत्नागिरी / वार्ताहर)
बदलत्या काळात आधुनिकतेच्या लाटेत अनेक पारंपरिक लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर असताना, त्या जतन करून पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य काही मोजके कलावंत निष्ठेने करत आहेत. अशाच ध्येयवेड्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे वाटद-वझरवाडी (ता. रत्नागिरी) येथील लोकशाहीर ओमकार मधुकर शितप. आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि कलेप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर त्यांनी कोकणातील पारंपरिक ‘नमन’ आणि इतर लोककलांना नवसंजीवनी देण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे.
लहानपणापासूनच लोककलेची आवड असलेल्या ओमकार शितप यांनी अनेक संकटे आणि अडचणींवर मात करत लोककला जतन करण्याचा निर्धार केला. कोरोना महामारीनंतर २०२१ मध्ये त्यांनी समविचारी युवक आणि ज्येष्ठ कलाकारांना सोबत घेऊन ‘श्री कालकाई देवी रिमिक्स नमन मंडळ’ या नमन कलासंचाची स्थापना केली. आज हा संच कोकणातील विविध भागांत लोककलेचे यशस्वी सादरीकरण करत रसिकांची मने जिंकत आहे.
गुहागर, रत्नागिरी, खेड, राजापूर, लांजा यांसह विविध तालुक्यांमध्ये या नमन संचाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर गाजले आहेत. पारंपरिक नमनाला आधुनिक संगीताची जोड, प्रभावी रंगमंचीय सादरीकरण, शास्त्रशुद्ध भाषा आणि दर्जेदार अभिनय यामुळे या संचाने रसिकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ओमकार शितप यांनी २०१० पासून गायन क्षेत्रातही आपली वेगळी छाप पाडली. कोकणातील लोकप्रिय लोककला झाकडीमध्ये त्यांनी कलगीवाले शाहीर म्हणून नावलौकिक मिळवला आहे. महाराष्ट्र गौरव भूषण कवी-शाहीर गुरुवर्य शंकर भारदे यांचे ते शिष्य असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लोककलेची परंपरा अधिक समृद्ध केली आहे. याशिवाय, श्री राधाकृष्ण नृत्य कलापथक, वाटद-वझरवाडी या संचामार्फत मुंबईसह विविध ठिकाणी त्यांनी प्रभावी सादरीकरण करून कोकणच्या लोककलेचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे वाटद परिसरात ते लोकशाहीर म्हणून ओळखले जातात.
आजच्या काळात विविध गावांतील कलाकारांना एकत्र आणून तब्बल १८ कलाकारांचा नमन संच उभा करणे आणि सातत्याने तो यशस्वीपणे चालवणे हे मोठे आव्हान आहे. मात्र ओमकार शितप यांनी ते प्रत्यक्षात करून दाखवले. या प्रवासात कलझोंडी येथील कलाकार दीपक वीर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच स्वर्गीय शांताराम मांजरेकर गावकर यांची लोककलेच्या जतनाची इच्छा पूर्ण करण्याचे कामही त्यांनी केले.
या संचातून अनेक नवोदित कलाकार घडले आहेत. अमित बारगुडे यांनी उत्कृष्ट अभिनयामुळे आपली ओळख निर्माण केली, तर प्रमोद शितप हे गोड गळ्याचे युवा गायक म्हणून लोकप्रिय झाले. बालकलाकार कुमार सार्थक संदेश धामणस्कर यांनीही आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.
कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ओमकार शितप यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. लोककलेच्या जतनासाठी त्यांनी उचललेले हे पाऊल अनेक तरुणांसाठी आदर्श ठरत असून, त्यांच्या या सेवाभावी कार्याला रसिकांकडून भरभरून दाद मिळत आहे.
कोकणची लोकसंस्कृती, नमन आणि झाकडी यांसारख्या पारंपरिक कलांचे संवर्धन करण्यासाठी अविरत कार्य करणाऱ्या लोकशाहीर ओमकार मधुकर शितप यांना कोकणवासीयांकडून मानाचा मुजरा व्यक्त केला जात आहे. भविष्यातही त्यांच्या हातून लोककलेची अशीच अविरत सेवा घडत राहो, अशी भावना रसिकांनी व्यक्त केली आहे.

