( गणपतीपुळे / वैभव पवार )
येत्या १५ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुरुवात होणार असून, नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालकांची लगबग सुरू झाली आहे. आपल्या पाल्यांसाठी गणवेश, वह्या, पुस्तके, दप्तर आणि इतर शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा शालेय साहित्याच्या दरात तब्बल २० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने पालकांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे.
दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे पालकांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, शालेय खर्चाचा ताण वाढला आहे.
गणवेशासह सर्वच साहित्य महागले
यंदा दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास पेट्या, वॉटर बॉटल, टिफिन बॉक्स यांसह विविध शालेय साहित्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर शालेय गणवेशाचे दरही ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याने पालकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
कार्टून थीमच्या साहित्याला विद्यार्थ्यांची पसंती
बाजारपेठेत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक आणि रंगीबेरंगी साहित्य उपलब्ध झाले आहे. ‘छोटा भीम’, ‘बार्बी’ तसेच इतर लोकप्रिय कार्टून पात्रांची चित्रे असलेली दप्तरे, कंपास पेट्या, डबे आणि पाण्याच्या बाटल्या विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे बच्चेकंपनी पालकांसोबत उत्साहाने खरेदीसाठी बाजारात दाखल होत आहे.
‘झेडपी’ची शाळा भारीच!
जिल्ह्यातील अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘समग्र शिक्षा अभियानांतर्गत’ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट आणि मोजे उपलब्ध करून दिले जातात. मात्र, खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शैक्षणिक शुल्कासह सर्व शालेय साहित्याचा खर्च स्वतः करावा लागत असल्याने आर्थिक ताण वाढत आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर “आपली झेडपीची शाळाच भारी,” अशा प्रतिक्रिया काही पालकांकडून व्यक्त होत आहेत.

